![]()
अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना वाळेकर यांनी ‘आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात, हे चालणार नाही,’ अशा आक्रमक शब्दांत आमदारांवर टीकास्त्र सोडले. यासोबतच, अंबरनाथ नगरपालिकेत आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरी, कोणत्याही चुकीच्या कामाला पाठीशी न घालता त्याविरोधात ठामपणे आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना अरविंद वाळेकर यांनी आमदारांविषयी बोलताना म्हटले की, आमदारांकडून 2011 ची जीआर दाखवून झोपडवासीयांची दिशाभूल केली जात ए आणि भुलथापा मारल्या जातात. हाऊसिंग बोर्डाच्या प्रकल्पाला 15 वर्षे झाली, तरीही नागरिकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. पुढच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांनी यावर आवाज उठवावा, त्यांनी तसे केले तर त्यांचा सत्कार मी स्वतः करेन, असा टोला वाळेकर यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना अरविंद वाळेकर म्हणाले, मात्र 15 वर्षे झाली लोकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत, त्यामुळे आमदार नेमकं काम काय करतात? तर फक्त संध्याकाळी जाऊन फार्म हाऊसवर बसायचं, अशा शब्दांत आमदार बालाजी किणीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. चुकीच्या कारभाराला आळा बसला नाही, तर मोर्चा काढू- वाळेकर वरिष्ठांच्या आदेशामुळे अंबरनाथ नगरपालिकेत एकत्र आलेल्या भाजप आणि शिवसेनेत अद्यापही अंतर्गत धुसफूस कायम असल्याचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या विधानावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना त्यांनी पालिकेतील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत, आपले गटनेते व नगरसेवक यावर मौन बाळगून असल्याची खंत व्यक्त केली. तसेच या चुकीच्या कारभाराला आळा बसला नाही, तर वेळ पडल्यास थेट मोर्चा काढण्याचा सज्जड इशाराही वाळेकर यांनी शिवसेनेच्या या बैठकीत दिला आहे.
Source link
'आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात':वेळ पडलीच तर थेट मोर्चा काढू, अंबरनाथ शहरप्रमुखांचा बालाजी किणीकरांना इशारा