![]()
आकांक्षित जिल्हा व तालुका विकास कार्यक्रमांतर्गत सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कामांची गुणवत्ता वाढवावी व लक्षणीय सुधारणा साधावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी तारीख 16 दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिगंबर माडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले की, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विविध परिमाणांची नियमित तपासणी करून प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. जिल्हा किंवा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्यास नीती आयोगाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. हा निधी विविध विकास कामांसाठी उपयोगात आणता येणार असून, त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. उत्तम कामगिरीच्या आधारे डेल्टा रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. गृहविकास (हाऊसिंग) क्षेत्रात सध्या 16.52 टक्के प्रगती असून, त्यात वाढ करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन, आरोग्य तपासणी, घरकुल या घटकांमध्येही सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कारही दिले जातात, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विभागांनी स्पर्धात्मक भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य व पोषण विभागाला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी एन-क्वॉस (NQAS) सर्टिफिकेशन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे सांगितले. पूरक पोषण आहार 100 टक्के सुनिश्चित करणे, तसेच अतितिव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील त्रुटी दूर करून वितरण व्यवस्थेत सुधारणा करावी, असे निर्देश देण्यात आले. फेस रिकग्निशन, भारत नेट, प्रधानमंत्री आवास योजना व प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान यामध्ये प्रगती साधण्यावर भर देण्यात आला. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची ओळखपत्रे, स्थलांतर, टीसी व यु-डायस प्रणालीतील नोंदी अद्ययावत ठेवाव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व बदलांची काटेकोर नोंद करावी, असेही सांगितले. पशुसंवर्धन विभागात औषध साठ्याचे ऑडिट करून वितरणाची अद्ययावत माहिती ठेवावी. मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य बीज व विक्रीची माहिती सादर करावी. ग्रामविकास विभागाने रस्ते, सभागृह व सामाजिक सुविधांतील वाढीची आकडेवारी द्यावी. सिंचन व जलसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात किती वाढ झाली याचा अहवाल सादर करावा. केवळ सीएनबी बांधकाम न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला का, याची खात्री करावी. शाळा व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची माहितीही सादर करावी. क्रीडा विभागाने क्रीडांगणे व व्यायामशाळांच्या विकासाची माहिती द्यावी. ग्रामपंचायतीमार्फत कामे न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच कामे करून घ्यावीत, असेही स्पष्ट करण्यात आले. आरोग्य व स्वच्छतेवर लक्ष आरोग्य विभागात दैनंदिन व मासिक तपासण्या नियमित कराव्यात. औषधांची स्वतः तपासणी करणे, स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्थेवर लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कामापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रे घेणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
Source link
आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करा:गृहनिर्माण, आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणेचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश