![]()
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, विदर्भात पावसाने हाहाकार उडवला असून पुरात वाहून गेल्याने पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विदर्भात अतिवृष्टीचा फटका; 5 जण वाहून गेले पश्चिम विदर्भाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या ४८ तासांत अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४५ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला असून, या पुराच्या पाण्यात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत ५ जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भ आणि कोकणाला पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर जोर: पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात विजांचा कडकडाट: भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळेल. मुंबई आणि मराठवाडा: मुंबईत रात्रभर सुरू असलेली पावसाची रिपरिप आजही कायम राहणार असून, मुंबईसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, मराठवाड्यातील काही भागांतही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल. उपग्रह नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा
पावसाला पोषक वातावरण कसे? सध्या राजस्थानच्या परिसरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच, ओराई, सिधी बंकुरा ते थेट मणिपूरपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याशिवाय, गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. देशात अनेक ठिकाणी महापूर, लष्कर तैनात महाराष्ट्रात पाऊस सुखावत असला तरी, देशातील इतर राज्यांमध्ये पावसाने मोठे तांडव सुरू केले आहे. गुजरात आणि आसाम या राज्यांमधील पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरिकांना पुरातून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी चक्क लष्कराची मदत घेतली जात आहे. २२ राज्यांना वादळाचा इशारा हवामान विभागाने देशभरातील २२ राज्यांमध्ये तीव्र वादळाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ३० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल. आगामी काही दिवसांत देशभरातील पावसाची तीव्रता किंचित कमी होईल, असा अंदाज असला तरी कर्नाटकच्या किनारपट्टी आणि दक्षिण भागात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस सुरूच राहील. हेही वाचा.. बिहार-झारखंडमध्ये वीज कोसळून 10 ठार: राजस्थानात रस्ते पाण्याखाली, यूपी – छत्तीसगडसह 18 राज्यांना पावसाचा इशारा देशातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी यूपी, बिहार आणि छत्तीसगडसह 18 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढला आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथजवळील अनेक भागांना धोकादायक क्षेत्र (डेंजर झोन) घोषित करण्यात आले आहे. यामुळे यात्रेकरू आणि सामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रविवारी बिहार आणि झारखंडमध्ये वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. तर, राजस्थानमध्ये मुसळधार पावसानंतर अजमेर, जोधपूर आणि बाडमेरमधील रस्त्यांवर पाणी साचले. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पावसाची तुफान फटकेबाजी:विदर्भातील 45 तालुक्यांत अतिवृष्टी, पुरात 5 जण वाहून गेले; मुंबईसह कोकणला येलो अलर्ट