![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी ‘माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल’ असे वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याला दुजोरा देणारे सूचक विधान केले आहे. “आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय आहे? देवेंद्रजींचे वय अजून कमी आहे, भविष्यात त्यांना संधी मिळाली पाहिजे,” असे महाजन म्हणाले. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रायगडचे पालकमंत्रिपद, छगन भुजबळांसोबतचे संबंध, संजय राऊतांची टीका आणि नाशिकमधील खड्डे अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देवेंद्रजी सर्वगुणसंपन्न, त्यांना संधी मिळाली पाहिजे फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाबाबत विचारले असता महाजन म्हणाले, “संजय राऊत वारंवार म्हणतात की उद्धव ठाकरेंसारखे नेतृत्व देशाला मिळाले तर देशाचे भाग्य उजळेल, हा किती मोठा जोक आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या काळात स्वतःच्या घराची पायरी ओलांडली नाही, मंत्रालयात गेले नाहीत, त्यांना देशाचा पदभार दिला तर देशाचे काय होईल?” “त्यापेक्षा देवेंद्रजींमध्ये काय कमी आहे? ते सर्वगुणसंपन्न आहेत. त्यांच्या काकांचे ते वैयक्तिक मत असू शकते, पण आमच्या राज्यातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय? त्यांना संधी मिळाली पाहिजे.” मात्र, गडकरी की फडणवीस, तुमच्या पसंतीचा पंतप्रधान कोण? या प्रश्नावर महाजनांनी सावध भूमिका घेत, हा निर्णय दिल्लीतील हाय कमांडचा असल्याचे स्पष्ट केले. भुजबळांसोबतच्या दुराव्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण नाशिकच्या एका कार्यक्रमात महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात दुरावा दिसल्याच्या चर्चांवर त्यांनी पडदा टाकला, “माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण एकत्र केले. मी त्यांचा हात धरून त्यांना क्रेनमध्ये वर घेऊन गेलो होतो. स्टेजवर जेवढे बोलायचे तेवढे आम्ही बोललो, पण समोर लोक असताना सतत बोलत राहणे शक्य नसते. आमच्यात कोणताही दुरावा किंवा मतभेद नाहीत.” रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल रायगडच्या पालकमंत्रिपदावरून भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यावर महाजन म्हणाले, “विधान परिषदेच्या (MLC) निवडणुकांदरम्यान या संदर्भात काही चर्चा झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. पण नेमका काय विषय झालाय, हे मला माहीत नाही. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल, असे मला वाटते.” तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करण्याची मागणी केल्याबाबत ते म्हणाले की, भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो, मात्र याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. संजय राऊतांवर पलटवार, त्यांच्या जिभेला हाड नाही संजय राऊत यांनी गिरीश महाजनांचा उल्लेख ‘बटू चंपतराय’ असा केल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले, “संजय राऊत हे पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, सरन्यायाधीश, निवडणूक आयोग सर्वांवरच वाटेल ते बोलतात. त्यांच्या जिभेला हाड नाहीये. त्यांना ना जनतेतून निवडून यायचे आहे, ना काही. मागच्या वेळी आम्ही पाठिंबा दिला म्हणून ते मागच्या दाराने खासदार झाले. माझ्यावर काही बंधने आहेत, पण त्यांना काहीही बोलण्याची मुभा आहे, त्यामुळे ते मला ‘चंपतराय’ किंवा अजून काहीही म्हणू देत, मला काही फरक पडत नाही.” पावसामुळे झालेले नुकसान ही नैसर्गिक आपत्ती जळगाव आणि राज्यातील इतर भागात पावसामुळे पाणी साचून झालेल्या नुकसानीवर महाजन म्हणाले, “यंदा 75-80 वर्षांत झाला नसेल एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे. पालघर, रायगड, पुणे आणि गुजरातमध्येही अशीच भीषण परिस्थिती आहे. कितीही पैसे खर्च केले, तरी अशा अस्मानी संकटापुढे सर्व यंत्रणा अपुऱ्या पडतात. मात्र, सरकार योग्य ती मदत करेल.” हेही वाचा… ‘पालकमंत्री करा’च्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका: म्हणाले- ‘फ्लेक्स काढायला सांगितले, नाशिकच्या खड्ड्यांकडे लक्ष द्या’ नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘छगन भुजबळांना पालकमंत्री करा’ अशी मागणी करणारे होर्डिंग लावल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या मागणीपासून स्वतःला दूर ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित फ्लेक्स तत्काळ काढण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले, “भुजबळांना पालकमंत्री करा, याचा अर्थ मीच पालकमंत्री व्हावे असा नाही. ज्यांनी माझ्या नावाचे फ्लेक्स लावले, त्यांच्याबद्दल मी नापसंती व्यक्त केली असून ते तत्काळ काढण्यास सांगितले आहे.” येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
'रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल!:गिरीश महाजन म्हणाले- "राज्यातला माणूस PM झाला तर वाईट काय?; भुजबळांशी 'दुराव्या'वरही दिले स्पष्टीकरण