![]()
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीओ) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, 1 सप्टेंबरपासून प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागणार आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये, तर त्यानंतर प्रति किलोमीटर दर 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरटीओ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत रिक्षा भाडेवाढीसह परिवहन क्षेत्रातील इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली. पुणे शहरात सार्वजनिक वाहतुकीमध्ये रिक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात; सुमारे दीड लाख रिक्षा प्रवाशांना सेवा देतात. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात होती. सीएनजीच्या वाढलेल्या किमती, वाहनांच्या सुट्या भागांचे दर, विमा, देखभाल खर्च आणि महागाईमुळे सध्याच्या दरात व्यवसाय करणे परवडत नसल्याचे संघटनांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर आरटीओ ने भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. नवीन भाडेदर लागू करण्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांना त्यांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन करून घेणे बंधनकारक आहे. मीटरमध्ये आवश्यक तांत्रिक बदल केल्यानंतरच नव्या दरानुसार भाडे आकारता येईल. हे नवीन दर पुणे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक रिक्षांसाठी लागू असतील. या निर्णयामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवास खर्चात वाढ होणार असली तरी, वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांना यामुळे दिलासा मिळेल, असे रिक्षा संघटनांनी म्हटले आहे. दुसरीकडे, प्रवासी संघटनांनी या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
Source link
पुणेकरांच्या खिशाला कात्री:रिक्षाच्या किमान भाड्यात 5 रुपयांची वाढ, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू; किमान भाडे 30 रुपये