![]()
सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजीत दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच, भाजपने एका ३० वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ‘संजय शिरसाट केवळ शुभेच्छा देण्यासाठी आले होते’ संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, “एका ३० वर्षांच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, यावर मी काय बोलू? संजय शिरसाट हे मला फक्त वैयक्तिक पातळीवर भेटायला आले होते आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यापलीकडे दुसरे काहीही नाही. आमचे कोणतेही राजकीय बोलणे झाले नाही. ‘तुम्ही युवकांचा आणि देशाचा चांगला मुद्दा उचलला’, असे म्हणून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.” याच मुद्द्यावरून भाजपला लक्ष करत दिपके म्हणाले, “मी भाजपाला सांगू इच्छितो की, एवढी घाबरण्याची गरज नाही. ईडी, सीबीआय सगळं काही तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे काहीच नाही. आम्हाला लोकं केवळ वैयक्तिकरित्या भेटायला येतात आणि चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतात.” ‘आंबेडकरांना विरोध करणाऱ्यांनी संविधानावर लेक्चर देऊ नये’ अतुल लिमये यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘देशद्रोही आणि संविधान विरोधी’ म्हटल्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपके यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “ज्या लोकांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये.” दिल्लीतील तक्रार आणि इतर आंदोलनांना पाठिंबा नुकतीच दिल्लीत दिपकेंविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “हे सर्व फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी केले जात आहे, बाकी यात काहीही तथ्य नाही.” तसेच, ई-२० च्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचे जे आंदोलन सुरू आहे, त्यासह सर्व लोकशाहीवादी आंदोलनांना आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘तरुणांशी बोलण्यासाठी तरुण चेहरेच हवेत’ राजकारणातील युवा वर्गाच्या सहभागावर दिपके यांनी आग्रही भूमिका मांडली. “मला असे वाटते की, तरुण लोकांनी तरुणांशी बोलले तर ते अधिक चांगले होईल. जोपर्यंत तुम्ही युवा आणि शिकलेले चेहरे पुढे आणणार नाही, तोपर्यंत काही अर्थ नाही,” असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘Gen-Z’ सोबत संवाद साधणार असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले की, जर मोहन भागवत संवाद साधणार असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण त्यासाठी त्यांनीही नवीन चेहरे पुढे आणले पाहिजेत.” यावेळी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनाही त्यांच्या नव्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. “प्रशांत किशोर हे राजकारणातील नवा चेहरा आहेत. लोकशाहीत जास्तीत जास्त नवीन लोकांनी पुढे आले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सीजेपीची पुढील रणनीती काय? जंतरमंतरवरील आंदोलनानंतर सीजेपीची पुढील दिशा काय असेल, यावर बोलताना दिपके म्हणाले, “उद्या आणि परवा सीजेपीची महत्त्वाची बैठक होणार आहे. जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनातून आम्हाला काय शिकायला मिळाले आणि पुढे काय रणनीती आखायची आहे, यावर या बैठकीत चर्चा होईल. तसेच देशभरात पक्षसंघटन कसे वाढवता येईल, यावरही आम्ही विचारमंथन करणार आहोत. हेही वाचा.. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके अडचणीत?:मारहाणीच्या आरोपांप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार; तातडीच्या अटकेची मागणी, नेमकं प्रकरण काय? सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले असून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. फैजान अन्सारी यांनी दिल्लीच्या डीसीपी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपके यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी आधीच दोन गुन्हे दाखल असल्याचा दावा करत, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
ED, CBI सगळं तुमच्याकडे तरी 30 वर्षांच्या तरुणाची धास्ती का?:शिरसाटांच्या भेटीवरून अभिजीत दिपकेंचा भाजपला टोला, दिल्लीतील तक्रारीवरही दिपकेंचे भाष्य