![]()
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘पीयूसी ३.०’ नियमावलीचा नवा मसुदा तयार करण्यात आला असून, त्यानुसार नवीन बीएस-६ गाड्यांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची मुदत थेट तीन वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. आधुनिक बीएस-६ वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ‘ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स’ सिस्टीम असल्याने ती कमी प्रदूषण करतात. यामुळे, नवीन ६ वर्षांपर्यंतच्या बीएस-६ गाड्यांना दरवर्षी किंवा दर सहा महिन्यांनी पीयूसी केंद्रावर जाण्याची गरज राहणार नाही. नव्या नियमांनुसार, ६ वर्षांपर्यंत जुन्या बीएस-६ गाड्यांना ३ वर्षांसाठी, ६ ते १० वर्षे जुन्या गाड्यांना १ वर्षासाठी, तर १० वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांना दर ६ महिन्यांनी पीयूसी काढावे लागेल. या नव्या प्रस्तावावर केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून ३० दिवसांच्या आत (ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत) हरकती व सूचना मागवल्या आहेत. प्राप्त झालेल्या हरकतींचा अभ्यास करून अंतिम कायदा लागू झाल्यानंतर देशातील करोडो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. नागरिक २६ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले मत नोंदवू शकतात. सूचना नोंदवण्यासाठी comments-morth@gov.in किंवा director-morth@gov.in या ईमेलवर संदेश पाठवावा. तसेच ‘सचिव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, १, संसद मार्ग, नवी दिल्ली-११०००१’ या पत्त्यावर टपालाद्वारे पत्र पाठवता येईल. ईमेल किंवा पत्राच्या विषयात ‘Objections/Suggestions on Draft Notification regarding PUCC 3.0 Rules’ असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. सध्याच्या केंद्रीय मोटर वाहन नियमांनुसार, नवीन कार किंवा दुचाकी खरेदी केल्यानंतर पहिल्या १ वर्षासाठी वेगळे पीयूसी प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नसते. १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बीएस-४ आणि बीएस-६ वाहनांसाठी दर ६ महिन्यांनी पीयूसी चाचणी करून त्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे, तर बीएस-१ ते बीएस-३ या जुन्या वाहनांसाठी दर ३ ते ६ महिन्यांनी पीयूसी काढावे लागते. वैध पीयूसी प्रमाणपत्र नसल्यास मोटर वाहन कायद्यानुसार ₹१०,००० पर्यंत दंड किंवा ६ महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
Source link
BS-6 गाड्यांना PUC ची मुदत वाढवली:केंद्राचा महत्त्वाचा प्रस्ताव, वर्षांऐवजी तीन वर्षांतून एकदाच चाचणी