Headlines

काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात तीव्र आंदोलन:महिला नेतृत्वाचा कथित अपमान केल्याने काँग्रेस भवनसमोर घोषणाबाजी




महिला नेतृत्वाबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुण्यात जोरदार आंदोलन केले. बालगंधर्व चौकातील झाशीची राणी यांच्या पुतळ्यासमोर तसेच काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता येथे प्रदीप देशमुख, सुभाष जगताप आणि राजलक्ष्मी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला नेतृत्वाचा सन्मान राखण्याची मागणी करत काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात आणि महाराष्ट्रात महिलांनी विविध क्षेत्रांत नेतृत्व केले असून, त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याऐवजी त्यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरणे अस्वीकार्य असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने सुनील टिंगरे आणि वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वाखाली थेट काँग्रेस भवन गाठले. तेथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनादरम्यान महिला नेतृत्वाचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असून, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे आंदोलकांनी सांगितले. संबंधित नेत्यांनी माफी मागावी आणि महिला नेतृत्वाबाबत सन्मानाची भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *