![]()
‘राम कृष्ण हरी’ च्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या चातुर्मास कीर्तन महोत्सवाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाशिक येथील वारकरी भूषण ह.भ.प. चैतन्य महाराज निंबोळे यांचे कीर्तन झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे या चातुर्मास कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण आणि कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी ट्रस्टचे आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. समाजभूषण शांताराम महाराज निमन, अरुण पवार, उद्धव गोळे, वैभव महाराज साखरे, जयवंत चांदेरे आणि राधाकृष्ण गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चैतन्य महाराज निंबोळे म्हणाले की, दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा कीर्तन महोत्सव सर्वांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी आहे. या महोत्सवात आल्यानंतर ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांची आठवण येते. त्यांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी स्वतःला भाग्यवान मानले. प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, आषाढी वारीनंतर प्रथेप्रमाणे ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे ४० वे वर्ष आहे. वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची ही एक संधी असून, संतांनी दिलेली शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि समाजात त्याचे अनुकरण व्हावे, या उदात्त हेतूने हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवात दररोज सायंकाळी ५.३० वाजता विविध कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. यामध्ये आळंदी येथील ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प. ओंकार महाराज दुडे शास्त्री, आळंदी साधकाश्रम येथील ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचा समावेश आहे. तसेच, डोंबिवली येथील श्रीमलंग गड येथील ऑनलाइन कीर्तन गुरुकुलाचे संस्थापक ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, परभणी मानवत येथील वारकरीभूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे आणि पंढरपूर येथील मानकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
Source link
दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या चातुर्मास कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ:नाशिकच्या चैतन्य महाराजांच्या कीर्तनाने महोत्सवाची सुरुवात