Headlines

जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढणार- अधीक्षक कुंभार:भूमी अभिलेखच्या आश्वासनानंतर पवळेंचे ठिय्या आंदोलन स्थगित‎




अहिल्यानगर जिल्ह्यातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यासह प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती देण्याचे आश्वासन जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख संजय कुंभार यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले. शेतरस्त्यांच्या हद्दी स्पष्ट नसल्याने ग्रामीण भागात वारंवार वाद निर्माण होत असून शेतीची कामे अडचणीत येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शिव पाणंद शेतरस्त्यांच्या सर्व प्रलंबित मोजणी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, विशेष मोहीम राबवून अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, प्रत्येक प्रकरणासाठी कालमर्यादा निश्चित करावी, तसेच पूर्ण झालेल्या प्रकरणांचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करावा, अशा विविध मागण्या चळवळीच्या वतीने करण्यात आल्या होत्या. याशिवाय पारनेर कार्यालयात कायमस्वरूपी उपअधीक्षक व पुरेसे मोजणी कर्मचारी उपलब्ध करून देणे, ‘रोड मॉडेल व्हिलेज’ संकल्पनेअंतर्गत सर्व शिव पाणंद रस्त्यांच्या हद्दी निश्चित करणे आणि ‘मिशन झिरो पेंडन्सी’ राबविण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास जिल्हा अधीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शरद पवळे यांनी दिला होता. मात्र जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीची प्रक्रिया हाती घेण्याचे व प्रलंबित मोजणी प्रकरणांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शरद पवळे, आशिष कासार, गणेश इंगळे, बाळासाहेब थोरात, पोपट शेळके, अक्षय जगताप, सचिन शेळके, सोमनाथ तोडमल, एकनाथ पवार, रामदास तनपुरे, विठ्ठल मिसाळ, दादासाहेब शिरसाठ, गोवर्धन शिरसाठ, कृष्णा चव्हाण, राजेंद्र शिरसाठ, जालिंदर आठरे, राहुल गट, आंबादास आव्हाड आणि विक्रांत कासार उपस्थित होते. पारनेरमध्ये अडीच हजार प्रकरणे प्रलंबित पारनेर तालुक्यातील शेतरस्ते व जमिनीच्या मोजणीसंदर्भातील सुमारे २ हजार ५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची अनेक प्रकरणेही प्रलंबित आहेत.या पार्श्वभूमीवर पवळे यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग यांना निवेदन सादर करून कार्यवाही करण्याची मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *