![]()
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेचे आता राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ नाशिक व नागपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात ‘चप्पल मारो’ आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये मोठा तणाव; दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले नाशिक शहरात सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांना वेळीच मध्यस्थी करावी लागली. चोख पोलीस बंदोबस्त आणि मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला चपला मारून आपला तीव्र निषेध नोंदवला. नागपुरातही राष्ट्रवादीचे निदर्शने नाशिकप्रमाणेच नागपुरातही राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. नागपुरातील मध्यवर्ती असलेल्या व्हेरायटी चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शने केली. संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या या भाषेचा निषेध नोंदवला जात आहे. काय आहे नेमका वाद? बीड दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र, त्यावेळी सुनेत्रा पवारांनी मौन बाळगले आणि शेजारी बसलेल्या धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत पत्रकारांना रोखले होते. या घटनेवरून काँग्रेसने सुनेत्रा पवारांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा केला. या शब्दप्रयोगावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. हेही वाचा.. ‘गुंगी-गुडिया’ टीकेवर सुनील तटकरे संतप्त:म्हणाले- काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली, दिलगिरीने विषय संपत नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडीया असा शब्दप्रयोग करत काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे, अशा शब्दांत तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. सविस्तर वाचा सुनेत्रा पवारांवरील टीका ही महिला म्हणून नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर:प्रश्नांवर लपून बसणारे मोदी-शहा ‘गुंगे-गुड्डे’ उपमुख्यमंत्र्यांनी तीच भूमिका स्वीकारली का?- राऊत सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे तो अमित शहा यांचा पक्ष आहे. ते जसे लपून बसले आहेत ती भूमिका यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतरमंतरवर लाठीचार्ज आणि कारवाईचे आदेश कोणी दिले पण त्यांनी मौन बाळगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही गुंगा गुड्डे आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा
Source link
सुनेत्रा पवारांवरील टीकेचे राज्यभर पडसाद:नाशिक-नागपुरात राष्ट्रवादीचे आंदोलन, नाशकात काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने