![]()
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’मधील अग्रलेखातून टिळक पुरस्कारावर केलेल्या टीकेला टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी यंदाच्या टिळक पुरस्काराला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ला दिलेला पुरस्कार असे संबोधले होते. डॉ. टिळक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, हा प्रतिष्ठित पुरस्कार सन १९८३ पासून दिला जात आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराचे राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती. पाहुण्यांच्या निवडीवरही आक्षेप घेण्यात आला, परंतु ट्रस्टमध्ये याबाबतचा निर्णय अनेक महिन्यांपूर्वीच घेतला जातो आणि त्यानुसार कार्यक्रमाची रचना ठरवली जाते. ते म्हणाले की, चांगला कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न होता आणि त्यानुसारच नियोजन केले गेले. देशातील लोकांना हा कार्यक्रम आवडला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कार्य अमूल्य आहे. त्यांच्या गुप्तचर खात्यातील कामाची माहिती जाहीरपणे सांगता येत नाही. अनेक वर्षे काम करून त्यांना मिळालेल्या पुरस्काराला ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे काम म्हणणे, हे त्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे असून ते चुकीचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करणे सोपे नसते. ब्रिटिशांविरोधात आपल्या क्रांतिकारकांनीही अशाच पद्धतीने कार्य केले होते. आज गुप्तचर खाते जगभरात भारताला सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहे आणि त्यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात. घरात बसून त्यांचे काम कोणालाही समजणार नाही. डॉ. टिळक यांनी स्पष्ट केले की, कोणताही पुरस्कार वशिला लावून दिला जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य पाहूनच पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांसारखे नेते उपस्थित होते, ज्यामुळे त्यात पक्षीय राजकारण नव्हते हे स्पष्ट होते. लोकमान्य टिळक यांची परंपरा जपण्याचे काम आम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून करत आहोत.
Source link
टिळक पुरस्कारावरून राजकारण चुकीचे:डॉ. रोहित टिळक यांचे संजय राऊत यांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी' टीकेला प्रत्युत्तर