Headlines

आढावा बैठक:जन्म-मृत्यूच्या नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांमध्ये पूर्ण करा- महापौर श्रीचंद तेजवानी




प्रतिनिधी । अमरावती जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण करण्यासह प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचे निर्देश बुधवारी ५ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी मनपाच्या आरोग्य विभागाला दिले. स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहात मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाच्या कामाचा आढावा घेत विभागाच्या दैनंदिन कामकाजाची, प्रलंबित प्रकरणांची, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती जाणून घेतली. यावेळी जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया कार्यक्षम, पारदर्शक, नागरिकाभिमुख करण्यावर भर देत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.बैठकीदरम्यान महापौरांनी जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक अर्जाची पडताळणी करून जन्म, मृत्यू नोंदणी सात दिवसांत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे त्यांनी निर्देश दिले. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना जन्म, मृत्यू प्रमाणपत्रासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रमाणपत्रांचे तातडीने वितरण करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. महापौर श्रीचंद तेजवानी म्हणाले की, जन्म, मृत्यू नोंदणी ही नागरिकांसाठी महत्त्वाची सेवा आहे. शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, वारसाहक्क, बँकिंग, विमा, इतर अनेक प्रशासकीय कामांसाठी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे या प्रक्रियेत होणारा विलंब नागरिकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. म्हणून विभागाने प्रत्येक अर्जाकडे गांभीर्याने पाहून वेळेत नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे. या वेळी त्यांनी विभागातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत त्यांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. प्रकरण प्रलंबित ठेवू नये, अर्जांत त्रुटी असल्यास नागरिकांना माहिती देऊन त्या दूर करण्यासाठी सहकार्य करावे, प्रक्रिया पारदर्शक राबवावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.महापौरांनी अभिलेख व्यवस्थापन, डिजिटल नोंदणी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, प्रमाणपत्र वितरण प्रणालीबाबतही माहिती घेतली. नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जन्म-मृत्यू नोंदणीची सद्यस्थिती, प्रलंबित अर्ज, प्रमाणपत्र वितरण, ऑनलाइन सेवा, भविष्यातील कार्ययोजनाबाबत माहिती सादर केली. त्यावर महापौरांनी मुद्द्यांवर चर्चा करून नागरिकांना जलद, सुलभ व प्रभावी सेवा देण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. या बैठकीत सभागृह नेता चेतन गावंडे, सभापती राधा कुरील, राजु कुरील, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम उपस्थित होते. सेवा वितरणात कोणतीही दिरंगाई होऊ नये तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले. याशिवाय, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कामकाजात पारदर्शकता राखावी आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहनही महापौरांनी केले. सेवा वितरणात दिरंगाई नको, तक्रारींचे निराकरण करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *