![]()
मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वेगाने सुरू आहे. ८ जुलै रोजी झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही तातडीने केली जात असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. आतापर्यंत अक्षय सावंत (वय ३५), सन्नी माने (वय ३९), राहुल गायकवाड (वय ३५), वामन कसबे (वय ३५), नागेश गायकवाड (वय २६), सुनील कोरके (वय ४०) आणि रणजीत पाटील (वय २२) या सात मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत नियमानुसार जमा करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील मृत भावेश वाणी आणि महेश कुंभार यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. संबंधित कागदपत्रे प्राप्त होताच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या वारसांच्या खात्यातही नियमानुसार मदत तातडीने जमा केली जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. या संदर्भात बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच पात्र वारसांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा केली जात आहे. उर्वरित लाभार्थ्यांची कागदपत्रे प्राप्त होताच त्यांनाही विलंब न लावता आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.” महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “मोशी दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शक्य तितक्या लवकर आर्थिक दिलासा मिळावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. कोणत्याही मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे प्राप्त होताच नियमानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.”
Source link
मोशी कचरा डेपो दुर्घटना:7 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जमा