Headlines

'फडणवीस कोणा एकाच्या जिवावर CM नाही झाले':सर्व अठरापगड जातींचा त्यांना पाठिंबा, प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार




नाशिकमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. कुणबी प्रमाणपत्र, मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील जरांगेंच्या विधानांचा समाचार घेताना दरेकरांनी ‘प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहून बोलावे’, असा स्पष्ट इशारा दिला. तसेच, देवेंद्र फडणवीस हे कोणा एका व्यक्तीच्या कृपेमुळे नव्हे, तर राज्यातील अठरापगड जाती आणि बहुजन समाजाच्या पाठिंब्यामुळेच मुख्यमंत्री झाले, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. प्रवीण दरेकर म्हणाले, पुन्हा पुन्हा आक्रमक होणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र विशेष समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीत अवैध असेल तर मी म्हणतो म्हणून प्रमाणपत्र द्या, असे करता येत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रमाणपत्र योग्य असेल, तर त्यांनी पुन्हा शासकीय सिस्टीममध्ये जावे. जाणीवपूर्वक एखाद्याचे प्रमाणपत्र अवैध ठरवावे, असे सरकार कधीही करणार नाही. देवेंद्रजी हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयावर सकारात्मक आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाला ओबीसीसदृश सर्व सवलती दिल्या आहेत. मात्र कोणाला राजकारण करायचे असेल, तर तो नाईलाज आहे. कोणालाही दिलेले प्रमाणपत्र अवैध ठरवता येत नाही. तो निर्णय त्या सक्षम अधिकाऱ्याने घेतलेला आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. जरांगे यांनी पाडण्यापेक्षा जोडण्याचे काम करावे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील मनोज जरांगे यांनी टीका केली. बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितले असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले, मला असे वाटते की मनोज जरांगे यांनी पाडण्यापेक्षा जोडण्याचे काम करावे. समाजा-समाजात विद्वेषाची दरी निर्माण करण्यापेक्षा विकासासाठी मेहनत घ्यावी. वाईट करायला फार अक्कल लागत नाही, मात्र चांगले करायला खूप अक्कल लागते. सरकार मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी तयार तसेच सगळ्या जाती-धर्माला, समाजाला बरोबर घेऊन फडणवीस बहुजन, वंचितांना घेऊन काम करत करत आहेत. मनोज जरांगे यांचा सातत्याने सन्मान केला आहे. जेव्हा आंदोलन झाले तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय घेतले. विखे पाटील किंवा प्रसाद लाड यांनी देखील मागील काळात चर्चा केली. आजही सरकार मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहे. मात्र त्यांनी विषय समजून घेतले पाहिजेत, असे दरेकर यांनी म्हटले आहे. कोणा एकाच्या जिवावर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाहीत मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रवीण दरेकर यांना विचारले असता, मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे बघतील, त्यावर मी काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, कोणालाही माझ्या एकाच्या जीवावर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, असे बोलता येत नाही. राज्यातील अठरापगड जाती आणि सर्व समाजाने महायुतीला मतदान केले. कोणी जर माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले, असे म्हणत असेल तर पुन्हा जातीय तेढ निर्माण होईल आणि राज्यात अराजकता माजेल. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे आणि त्याला साजेसे आपण वागले पाहिजे, असा सल्ला देखील दरेकर यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या जीवावरच देवेंद्रजींचे राजकारण आहे ना? मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटले की, मनोज जरांगे यांच्या जीवावरच देवेंद्रजींचे राजकारण आहे ना? ते म्हणणार तेव्हा वरती आणणार, ते ठरवणार तेव्हा खाली नेणार. मनोज जरांगे यांना माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस राजकारणात खूप पुढे गेले आहेत. आपण आपल्या मर्यादेत आणि आपल्या विषयापुरते बोलावे. देवेंद्र फडणवीस यांना पुढे नेण्यात, त्यांना सक्षम करण्यात त्यांचा पक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्र सक्षम आहे. तुम्हाला योगदान देता आले नाही तर देऊ नका. पण, अहंकाराची भाषा करू नका, असा जोरदार पलटवार दरेकरांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *