Headlines

रिंग रोड, मेट्रो मार्ग, पूररेषा माहिती घरबसल्या उपलब्ध:'पीएमआरडीए'चे 'जीआयएस' पोर्टल सज्ज; नियोजनविषयक सर्व माहिती एका क्लिकवर




पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘जीआयएस’ (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) आधारित सार्वजनिक पोर्टल विकसित केले आहे. नागरिक, गुंतवणूकदार, विकासक, वास्तुविशारद, अभियंते आणि विविध शासकीय विभागांना नियोजनविषयक माहिती सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. या सुविधेमुळे प्रादेशिक नियोजनाची प्राथमिक माहिती आता घरबसल्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या सार्वजनिक ‘जीआयएस’ पोर्टलवर ‘पीएमआरडीए’ कार्यक्षेत्राची सीमा, मंजूर प्रादेशिक योजना (आरपी), प्रस्तावित नगररचना योजना (टीपी स्कीम), गावहद्द तसेच महानगरपालिका व नगरपरिषदांच्या सीमांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, एमएसआरडीसी व पीएमआरडीए रिंग रोड, पुणे मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्गीकृत रस्ते आणि मेट्रो स्थानकांभोवतीचे टीओडी (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) झोन यांसारख्या पायाभूत सुविधांची माहितीही उपलब्ध आहे. पर्यावरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाच्या पूर लाल व निळ्या रेषा, वन्यजीव अभयारण्य, हिल स्टेशन व टाउनशिपच्या सीमा तसेच एनडीए, एचईएमआरएल, एमएडीसी (पुरंदर विमानतळ) आणि इतर संरक्षण विभागांचे बफर झोन यांची माहितीही टप्प्याटप्प्याने पोर्टलवर समाविष्ट केली जात आहे. या पोर्टलमुळे भूखंड किंवा मालमत्तेच्या परिसरातील नियोजनाची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना ‘पीएमआरडीए’ कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय पाठपुराव्याचा ताण कमी होईल. तसेच, विकासक, वास्तुविशारद आणि अभियंत्यांना विकास प्रस्ताव तयार करताना आवश्यक असणारी अधिकृत प्राथमिक माहिती सहज उपलब्ध होईल. हा डिजिटल प्लॅटफॉर्म नियोजन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवेल आणि विविध शासकीय विभागांमधील माहितीचा समन्वय सुधारण्यास मदत करेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डिजिटल गव्हर्नन्स’ला चालना देणे आणि शाश्वत विकासासाठी माहितीआधारित निर्णय घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रातील नियोजन आणि विकास प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे जीआयएस आधारित सार्वजनिक पोर्टल अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांना आता त्यांच्या भूखंडाच्या परिसरातील रस्ते, पूररेषा, मेट्रो मार्ग आणि प्रादेशिक नियोजनाची अधिकृत प्राथमिक माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि ‘पीएमआरडीए’ कार्यालयाच्या फेऱ्याही कमी होतील. ‘डिजिटल गव्हर्नन्स’ला चालना देत पारदर्शक व सुलभ प्रशासन देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ कटिबद्ध आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *