Headlines

शरद पवारांना मोठा राजकीय धक्का? तीन दिवसांत मोठा निर्णय:पवार गटातील मोठा नेता यू-टर्न घेणार, भाजपची ताकद वाढणार




अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीचा परिणाम थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राज्यातील राजकारणावर होऊ शकतो. पुढील तीन दिवसांत एक मोठा नेता शरद पवार यांची साथ सोडू शकतो, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. त्यामुळे या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे लागली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या सुपुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे हे उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गोविंद मोकाटे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न भरण्यामागे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीमुळेच त्यांनी पाऊल मागे घेतले का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे 20 एप्रिल रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते अंतिम निर्णय जाहीर करतील. काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्यामुळे हा मेळावा घेतला जाणार असल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करणार का किंवा अक्षय कार्डिले यांना थेट पाठिंबा देणार का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी तालुक्यात मोठा प्रभाव आहे. नगरपालिका, बाजार समिती आणि साखर कारखाना यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर त्यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. तनपुरे कुटुंबाला स्थानिक पातळीवर मोठा मान-सन्मान आहे. त्यामुळे त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला, तर भाजपची ताकद या भागात लक्षणीय वाढू शकते, अशी चर्चा आहे. राजकारणाचे चित्र बदलण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही तनपुरे यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. याआधी त्यांनी तनपुरेंची खिल्ली उडवली होती, मात्र आता त्यांची स्तुती करताना दिसत आहेत. एकूणच, पुढील काही दिवसांत प्राजक्त तनपुरे कोणता निर्णय घेतात, यावर राहुरी पोटनिवडणुकीचे आणि राज्याच्या राजकारणाचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *