![]()
हिंगोलीच्या प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली यांनी सन 2025-26 मधील सोयाबीन खरेदी व्यवहारात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला असून संबंधित संस्थेविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत कठोर कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सहाय्यक निबंधकांना दिले आहेत. हिंगोली तालु्क्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करूनही त्यांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालानुसार एनसीसीएफच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत झालेल्या खरेदी व्यवहारात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार संस्थेने ऑनलाइन पोर्टलवर 9291.50 क्विंटल सोयाबीन खरेदी झाल्याची नोंद केली. मात्र प्रत्यक्षात 4568 क्विंटल खरेदी करण्यात आली असून उर्वरित 4723.50 क्विंटलची प्रत्यक्ष खरेदी न करता केवळ लॉट एन्ट्री करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. नंतर ही चुकीची लॉट एन्ट्री नियमबाह्य पद्धतीने रद्द करण्यात आल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. या संस्थेने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे नमूद करत पणन महासंघासोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा ठपकाही ठेवला आहे. त्यामुळे संस्थेला काळ्या यादीत टाकून भविष्यातील शासकीय खरेदी योजनांमधून वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने संस्थेचे लेखापरीक्षण करून आर्थिक परिणामांचे मूल्यांकन करावे तसेच सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही शिफारस करण्यात आली आहे. त्यावरून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी तात्काळ कारवाई करून संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Source link
हिंगोलीच्या प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करा:जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांचे आदेश