Headlines

स्वस्त पेट्रोलच्या आमिषाने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक:उंब्रज पोलिसांच्या तत्परतेमुळे 82 हजार 500 रुपये परत




स्वस्त दरात पेट्रोल देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या जाळ्यात अडकलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे 82 हजार 500 रुपये उंब्रज पोलिसांनी अवघ्या काही तासांत परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील पेरले फाटा परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संजय गाने यांनी 2 ऑगस्ट रोजी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीने स्वस्त दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत व्हॉट्सॲपवर स्कॅनर पाठवून पैसे भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने टप्प्याटप्प्याने एकूण 82 हजार 500 रुपये संबंधित खात्यावर पाठवले. मात्र रक्कम मिळाल्यानंतर ना पेट्रोल मिळाले, ना पैसे परत मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रार प्राप्त होताच उंब्रज पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. सातारा सायबर पोलिसांच्या मदतीने संबंधित बँकांशी संपर्क साधून व्यवहार तात्काळ ‘फ्रीज’ करण्यात आला. त्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून फसवणुकीची संपूर्ण 82 हजार 500 रुपयांची रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यात परत जमा करण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच ओटीपी, पिन किंवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार, महिला पोलिस कॉन्स्टेबल नीलम वैराट तसेच सातारा सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *