Headlines

कुठे धो-धो, कुठे कोरडेच; जिल्ह्यात पावसाचा लहरी अंदाज:7 ऑगस्टपर्यंत 244.4 मिमी पाऊस; अकोले तालुका आघाडीवर, राहुरीमध्ये सर्वाधिक तूट‎




यंदाच्या पावसाळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे. ७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तब्बल २४४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ७ ऑगस्टपर्यंत केवळ १४१ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १०३.४ मिमी अधिक पाऊस झाला आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाचे वितरण समान नसून अकोलेपासून राहुरीपर्यंत पर्जन्यमानात मोठी तफावत दिसून येत आहे. यंदा ३० जूनपर्यंत जिल्ह्यात ६६.१ मिमी, ३१ जुलैपर्यंत २३१ मिमी, तर ७ ऑगस्टपर्यंत २४४.४ मिमी पाऊस झाला. गतवर्षी ३० जूनपर्यंत ८१ मिमी आणि ३१ जुलैअखेर १२३ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या पावसात अकोले तालुका आघाडीवर असून तेथे तब्बल ५५० मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ कर्जत २९७.५, जामखेड २८५.१, श्रीगोंदे २५९.७, कोपरगाव २६०.५, पारनेर २५४.३, संगमनेर २१३, अहिल्यानगर २१६.१, राहाता १८०.१, पाथर्डी १७७.६, शेवगाव १६५.७, नेवासे १६१.९, श्रीरामपूर १३९, तर राहुरीत सर्वात कमी ८६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मुळा धरणाचा परिसर असलेल्या राहुरी तालुक्यातच पावसाचे प्रमाण सर्वात कमी राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस वाढला असला तरी त्याचे भौगोलिक वितरण असमान असल्याचे चित्र आहे. यंदा मान्सून काळात कमी दाबाचे पट्टे तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रवाहात सातत्य राहिले नाही. वारे ज्या भागातून वेगाने वाहतात, त्या पट्ट्यात अधिक पाऊस पडतो; तर लगतच्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहते. जुलैमध्ये काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्याची आकडेवारी वाढली असली, तरी पाऊस सातत्याने न पडता टप्प्याटप्प्याने झाल्याने तालुकानिहाय तफावत वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *