![]()
नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालके आणि युवकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. हा संशयित आरोपी गेल्या चार वर्षांपासून पैशांचे आमिष दाखवून आणि ब्लॅकमेल करून हे घृणास्पद कृत्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 6 ऑगस्ट रोजी संशयिताने भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून बोलावले होते, जिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार होणार असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी एक विशेष पथक स्थापन करून घटनास्थळी सापळा रचला. संशयित आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चेतन प्रकाश कोळी (वय 22, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन बालके आणि युवकांवरील लैंगिक अत्याचारांचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आली आहेत. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक अमोल देशमुख पुढील तपास करत आहेत. पैशाचे आमिष आणि ब्लॅकमेलिंगचा वापर हा संशयित आरोपी अल्पवयीन बालके आणि समवयस्क युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी सलगी वाढवत असे आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. या कृत्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे तो स्वतःच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवत असे. या व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या आधारे त्यांना सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितांवर वारंवार अनैसर्गिक कृत्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2022 पासून तो हे कृत्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. SIT मार्फत चौकशीची मागणी या धक्कादायक आणि संतापजनक प्रकारावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या गुन्ह्यामागे एखादे रॅकेट सक्रिय आहे का, तसेच अन्य कोणाचा यात सहभाग आहे का, याचा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितांना कायदेशीर, वैद्यकीय व मानसिक आधार द्यावा, असेही त्या म्हणाल्या. बालकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्कतेचे आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅड. संजय व्ही. पुराणिक यांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे समाजात कायद्याविषयी विश्वास आणि बालकांच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नागरिकांनी बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा आणि अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना किंवा संबंधित यंत्रणेला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाची कौतुकास्पद कामगिरी पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशित कांबळे आणि उपअधीक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, निकिता पाटोल, हवालदार जगदीश पाटील, रूपेश पगारे, राजेंद्र कटके, अमित भरवाड, आनंदा मराठे आणि निंबा वाघमोडे या विशेष पथकाने तत्परतेने कारवाई करत या नराधमाला गजाआड केले.
Source link
अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करणारा २२ वर्षीय नराधमाला अटक:गेल्या 4 वर्षांपासून सुरू होता घृणास्पद प्रकार; व्हिडिओ काढून पीडितांना करायचा ब्लॅकमेल