Headlines

विजयसिंह घाडगे, रणजीत पाटील, देवा चव्हाण यांना शौर्य पुरस्कार:निवृत्त लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांनी तरुणांना देश अखंड ठेवण्याचे आवाहन केले




पुणे येथे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित शौर्य पुरस्कार सोहळ्यात पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजीत पाटील आणि देवा चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी तरुणांना देशाला अखंड ठेवून महासत्ता बनवण्याचे आवाहन केले. लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणाले की, युवा पिढीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा स्वीकारार्ह नाहीत. स्वातंत्र्यानंतर ७८ हजार जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे, ते देश एकसंध ठेवण्यासाठी होते. आता देशाला संघटित आणि महासत्ता बनवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. भारतीय सेना ही देशातील जनतेची सेना असून, तिचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. या आठव्या शौर्य पुरस्कार सोहळ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजीत पाटील, देवा चव्हाण, पवन माने आणि पोलीस हवालदार निलेश भोरडे यांचा गौरव करण्यात आला. नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) होते, तर विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आणि खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राईकचे अनुभवकथनही केले. विंग कमांडर विनायक डावरे यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, पोलीस हे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. गुन्हा घडल्यानंतरच त्यांची आठवण येते. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांचे रक्षण करण्याचे पोलिसांचे कार्य प्रशंसनीय आहे. पोलिसांचे शौर्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देते, त्यामुळे त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. अॅड. शार्दुल जाधवर यांनी शौर्य पुरस्काराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की, पोलीस आणि सैनिकांनी देशासाठी केलेले कार्य व त्यांचे बलिदान विद्यार्थ्यांना समजावे आणि युवकांना देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हा पुरस्कार दिला जातो. देशाची बाह्य सुरक्षितता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच अंतर्गत सुरक्षितताही महत्त्वाची असून, पोलीस हे काम प्रभावीपणे करतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *