![]()
खरीप हंगामातील महत्त्वाचे आणि नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. जमिनीची सुपीकता व पोत कायम ठेवून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘कार्ड”” संस्थेच्या वतीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संवाद सभा व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. येथील सावकार पेठेतील अजिंक्य टेरेसवर सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. या प्रसंगी कार्ड संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार लाडोळे, व्यवस्थापक लक्षद्विप बोडखे, क्षेत्र प्रवर्तक ज्ञानेश्वर वाळके, आकाश दाभाडे, गौरव गुजर, तालुका उपकृषी अधिकारी राजनकर, सहाय्यक कृषी अधिकारी विठ्ठल बिहाडे आणि गटनेते संजय राजनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘कम्युनिटी ॲक्शन फॉर डेव्हलपमेंट सोसायटी”” (कार्ड), अंजनगाव सुर्जी यांनी दत्तक घेतलेल्या अडगाव बु., अडगाव खुर्द, मालठाणा आणि सदरपूर येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्याक्रमाच्या सुरुवातीला क्षेत्र प्रवर्तक ज्योती खिरोडकार यांनी प्रास्ताविकातून संस्थेची भूमिका व शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर संस्थाध्यक्ष विजयकुमार लाडोळे यांनी दीर्घकाळ टिकणारी शेती, वातावरणानुसार पीक पद्धतीत बदल, जमिनीचे पोषण मूल्य टिकवणे, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि जैविक खतांचा योग्य वापर या विषयांवर मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी राजनकर, बिहाडे आणि बोडखे यांनीही उपस्थितांशी संवाद साधत तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. अध्यक्षीय भाषणातून मनोहरलाल फाफट यांनी जमिनीचा कस टिकवून उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले. यादरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच अशोक घाटे यांनी केले, तर आभार ज्योती खिरोडकार यांनी मानले. पर्यावरणपूरक शेतीवर भर कार्यशाळेत तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार, केवळ रासायनिक खतांचा वापर टाळून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणे काळाची गरज बनली आहे. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जैविक खतांचे योग्य नियोजन करणे. जमिनीचे पोषण मूल्य कायम ठेवत बदलत्या वातावरणानुसार शेती पद्धतीत तातडीने बदल करणे. जमिनीचा पोत न बिघडवता दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे मार्गदर्शन केले. यामुळे शेतकऱ्यांना अनेक विषयावर अनमोल मार्गदर्शन लाभले.
Source link
सुपीकता, उत्पादन वाढीवर मार्गदर्शन:सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्साहात; तज्ज्ञ सहभागी