Headlines

तुमची जमीन हेच तुमचं अस्तित्व, जमिनी विकू नका:थेट उद्योगांत पार्टनर व्हा; राज ठाकरेंचे कोकणवासीयांना आवाहन, मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी




मुंबई-गोवा महामार्गाचे काम केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे रखडले आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी हडप केल्या जात असून, महाराष्ट्रात जमिनी विकण्याचाच धंदा सुरू आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे रायगड दौऱ्यावर असून ते आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी ‘तिसरी मुंबई’, कंत्राटदारांची पळापळ आणि कोकणवासीयांचे भवितव्य यावर अत्यंत आक्रमक शब्दांत भाष्य केले. “राजकीय हस्तक्षेपामुळेच कंत्राटदार पळाले” मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर संताप व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, “राजकीय हस्तक्षेपामुळेच या महामार्गाचे काम रखडले आहे. मागे मी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ‘कंत्राटदार कंटाळून निघून गेले’. पण माझा सवाल हा आहे की, ते कंत्राटदार कुणामुळे कंटाळले? आज मी नव्याने बांधलेल्या रस्त्यावरून आलो, पण त्याचीही अवस्था अत्यंत वाईट आहे. हा नवीन रस्ताही लवकरच खराब होणार आहे.” दौऱ्यापूर्वी मनसेच्या भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड दौऱ्यादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केली. या पाहणीपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत केले. ‘तिसरी मुंबई’ आणि भूमिपुत्रांचे अस्तित्व- ठाकरे सध्या चर्चेत असलेल्या ‘तिसऱ्या मुंबई’च्या प्रकल्पावर त्यांनी मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. “तिसऱ्या मुंबईसाठी इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणण्याची चर्चा सुरू आहे. पण हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे का? या सगळ्यात आपला इथला शेतकरी आणि जमीनदार हा केवळ ‘माजी जमीन मालक’ म्हणून उरणार आहे. तो फक्त ही तिसरी मुंबई उभी राहताना बघत राहील आणि बाहेरच्या राज्यांमधून लोक इथे येऊन स्थायिक होतील. शहरं उभी करायची, रस्त्यांची वाट लावायची आणि जमिनी विकायच्या, हाच धंदा महाराष्ट्रात सुरू आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली. “स्थानिकांच्या जीवावर विकास नको” आपला विकासाला विरोध नाही, मात्र माणसांना अंधारात ठेवू नका, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. “कोकणात जे प्रकल्प येत आहेत, त्याबद्दल स्थानिकांना काहीच माहिती नाही. जर ही डेव्हलपमेंट स्थानिक लोकांच्या वाट्याला येणार नसेल, तर ती काय कामाची? स्थानिकांच्या जीवावर या गोष्टी उभ्या करायच्या, त्यांच्याकडून जमिनी घ्यायच्या आणि त्यांना उद्ध्वस्त करायचे, हे खपवून घेतले जाणार नाही. आमचे पाणी आणि वीज वापरून बाहेरचे लोक पोसले जाणार असतील, तर स्थानिकांनी याला तीव्र विरोध केला पाहिजे.” “जमिनी विकू नका, प्रकल्पांमध्ये ‘पार्टनर’ व्हा” सर्व गोष्टी उद्योगपतींच्या हितासाठी सुरू असल्याचा दावा करत त्यांनी कोकणवासीयांना एक महत्त्वाचे आवाहन केले. ते म्हणाले, “जे उद्योग इथे येत आहेत, त्यांच्यात तुम्ही ‘पार्टनर’ (भागीदार) व्हा, पण कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जमिनी विकू नका. तुमची जमीन हेच तुमचे अस्तित्व आहे.” सत्तेतील लोकांना धक्के देण्याची गरज सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर आणि कारभारावर टीका करताना राज ठाकरे यांनी ‘पालकमंत्री’ या संकल्पनेलाच फालतू ठरवले. सध्या पालकमंत्री आणि या सर्व गोष्टी फालतू झाल्या आहेत. निधी येऊनही इथली परिस्थिती बदलत नाही. समस्या सोडवायच्या असतील, तर सत्तेमधील माणसे बदलणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना धक्के देत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणताही बदल दिसणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हेही वाचा.. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक कात्री!:राज्यात गाई-म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागले; जाणून घ्या प्रतिलिटरचे नवीन दर सर्वसामान्यांना आता आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. राज्यातील दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ येत्या मंगळवारपासून म्हणजेच ११ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे. दुधासोबतच इतर दुग्धजन्य पदार्थही महागणार असल्याने ग्राहकांच्या खिशावरील आर्थिक ताण आणखी वाढणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *