![]()
दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या डीपफेक व्हिडीओचा वापर करून एका महिलेची ४ लाख ९ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकीच्या घटनांनंतर आता हा नवीन प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. महिलेने समाज माध्यमांवर रतन टाटा यांचा बनावट व्हिडीओ पाहिला. त्यातील एका लिंकवर क्लिक केल्यानंतर तिला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मधूमोहन नावाच्या व्यक्तीने महिलेशी संपर्क साधला. या व्यक्तीने महिलेला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून महिलेने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने ४ लाख ९ हजार १०० रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत. उपहारगृहाचे कुलूप तोडून चोरी पुणे शहरातील लष्कर भागातील एका उपाहारगृहाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाहारगृहाच्या मालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे ईस्ट स्ट्रीट परिसरातील बॉम्बे गॅरेजसमोर ‘मसाला टाइम्स’ नावाचे उपाहारगृह आहे. मध्यरात्री चोरट्यांनी उपाहारगृहाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, फरार चोरट्यांचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक घाडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
रतन टाटांच्या डीपफेक व्हिडिओने महिलेची फसवणूक:सायबर चोरट्यांनी 4 लाखांची रक्कम लांबवली