Headlines

नक्षलवादाचा बिमोड: केंद्र-राज्य सरकारचे मोठे योगदान:विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले स्पष्ट




नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वित प्रयत्नांचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. पुणे संवादतर्फे आयोजित ‘नक्षलिझम : ए वॉर विदिन’ या परिसंवादात ते बोलत होते. एस. पी. कॉलेजच्या काकासाहेब चितळे सभागृहात हा परिसंवाद पार पडला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नक्षलवादाचा प्रत्यक्ष सामना केलेले पोलीस अधिकारी कुमुद आत्राम, गंगा इम्पावर आणि गजानन धाडे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोकांडे आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. निवृत्त कमोडोर श्रीकांत देशमुख आणि मनोज पोचट यांचीही उपस्थिती होती. पाटील यांनी नक्षलवाद हा आदिवासी समाजाच्या विकासाला आणि संस्कृतीला लागलेला कॅन्सर असल्याचे म्हटले. नक्षलवादाचा सामना करताना केवळ सुरक्षा कारवायांवर भर न देता ‘विश्वास, निर्माण आणि जनकल्याण’ या तीन प्रमुख आधारांवर काम करण्यात आले. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच दुर्गम भागात सरकारची उपस्थिती वाढवणे, रस्ते, मोबाइल नेटवर्क, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पोहोचवणे यामुळे या भागात सकारात्मक बदल घडून आला आहे. नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी रस्ते आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. २०१४ पासून नक्षलग्रस्त भागांमध्ये १२ हजार २४९ किलोमीटरहून अधिक रस्ते बांधण्यात आले असून, १७ हजार ३१९ किलोमीटरच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ९ हजार ६०० हून अधिक मोबाइल टॉवर उभारण्यात आले असून, सर्वाधिक प्रभावित भागातील ९६ टक्के गावांना मोबाइल कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि रोजगाराच्या संधी दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात ५९७ बळकटीकरण केलेली पोलीस ठाणी उभारण्यात आली आहेत. २०१४ मध्ये नक्षलवादी घटनांची नोंद करणाऱ्या ३३३ पोलीस ठाण्यांची संख्या आता १६ वर आली आहे. याशिवाय ४०८ नवीन CAPF सुरक्षा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. CoBRA, CRPF, DRG आणि STF यांसारख्या विशेष दलांच्या समन्वयामुळे सुरक्षा कारवायांची क्षमता वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, उपग्रह छायाचित्रे आणि डेटा विश्लेषणाचाही वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारने २०१५ मध्ये नक्षलवादाविरोधात नॅशनल पॉलिसी अँड ऍक्शन प्लॅन लागू करून सुरक्षा, संवाद आणि समन्वयावर आधारित व्यापक धोरण स्वीकारले. केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समस्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *