![]()
चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे आगामी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी श्रावण मास मांड (अखंड भजन) आणि अमावस्येनिमित्त चंदनउटी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मास मांडची सुरुवात सकाळी ५ वाजता लहान मंदिरात ढाल बसवून करण्यात येईल. त्यानंतर मुख्य मंदिरात महाराजांच्या गणाने विश्वस्त मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत या मांडीचा शुभारंभ पूर्णत्वास जाईल. दुपारी ४ वाजता संस्थानच्यावतीने अमावस्येनिमित्त चंदनउटी उत्सवदेखील आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या नियंत्रणाखाली महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण मास मांडदरम्यान बाहेरगावातील विविध अवधूत भजन मंडळांचा दैनंदिन सहभाग राहणार असून, यासाठी संस्थानच्या वतीने भजन मंडळांच्या पाळीचे नियोजनही करण्यात आले आहे. सहभागी अवधूत भजन मंडळांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार असून, नवीन सहभागी होणाऱ्या भजन मंडळांना महाराजांची गाथा भेट म्हणून देण्यात येईल. या सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सर्व भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने दररोज दुपारी १२ ते १.३० आणि रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रसाद (भोजन) वितरण करण्यात येत आहे. भाविकांनी संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद देणगीची पावती घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच इच्छुक अन्नदानदाते संस्थानला अन्नदानाची देणगी देऊन या सेवेत सहभागी होऊ शकतात. यासाठी संस्थानशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
Source link
सावंगा विठोबा मंदिरात श्रावण मास मांड, चंदनउटी उत्सव:12 ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन