Headlines

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमधील बाधित 35 शेतकऱ्यांना धनादेश वाटप




ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामामुळे बाधित झालेल्या फळबागांच्या कृषी मूल्यांकनाचा मोबदला अखेर शेतकऱ्यांना मिळाला आहे. आमदार विलास भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे खादगाव, सुलतानपूर, सोनवडी, गाव तांडा, खेर्डा, मोती तांडा आणि दावरवाडी आदी गावांतील ३५ बाधित शेतकऱ्यांना रविवारी कृषी मूल्यांकनाच्या मोबदल्याचे धनादेश वितरित करण्यात आले. जलसंपदा विभागामार्फत या योजनेअंतर्गत बंद नलिका वितरण प्रणालीचे काम वेगाने सुरू आहे. या कामात विविध गावांतील शेतजमिनी आणि फळबागा बाधित झाल्या होत्या. कृषी विभागाने या बाधित फळबागांचे मूल्यांकन पूर्ण केले होते, मात्र प्रत्यक्ष निधी मिळण्यास विलंब होत होता. आमदार विलास भुमरे यांनी याप्रकरणी विशेष प्रयत्न करून प्रशासकीय प्रक्रियेला गती दिली आणि शेतकऱ्यांचा हक्काचा मोबदला उपलब्ध करून दिला. खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचल्याने या परिसरातील कोरडवाहू शेतकरी आता बागायतदार झाले आहेत. जायकवाडी धरणातून पाणी मिळत असल्याने सिंचनाची शाश्वत सोय निर्माण झाली असून फळबागा, ऊस व बागायती पिकांचे क्षेत्र वाढले आहे. ब्रह्मगव्हाण योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनाला चालना देणारी ठरत असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला योगेश परदेशी, अमित जठार, तसेच शिवराज भुमरे, भूषण कावसानकर, विनोद बोंबले आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *