![]()
बोरगाव वैराळे ते अंदुरा मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी मंगळवार, ११ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. पुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन तातडीने प्रत
.
बाळापूर तालुक्यातील अंदुरा-गांधीग्राम मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पाऊस आल्यास १८ गावांचा वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास अंदुरा, बोरगाव, वैराळे, सोनाळा तसेच परिसरातील अनेक गावांचा संपर्क खंडित होतो. अनेकदा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे विद्यार्थी व रुग्णांचे हाल होतात. दैनंदिन गरजांसाठी २० ते २५ किलोमीटरचा वळणमार्ग वापरावा लागतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बियाणे, खते, शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च व वेळ सहन करावा लागतो. पूरस्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे विशेष हाल होतात. अनेक विद्यार्थ्यांचे सलग १५ ते २० दिवस शैक्षणिक नुकसान होते. आरोग्याच्या दृष्टीनेही रुग्णांचे प्रचंड हाल होतात. रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे कठीण होते. आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानीचा धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पुलाची उंची वाढवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे बाळापूर तालुकाध्यक्ष विष्णू भाऊराव अरबट यांनी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
आमदार-खासदारांनी मौन सोडावे : अंदुरा सोनाळा गांधीग्राम पुलाच्या उंचीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आमदार-खासदारांनी मौन सोडून गतीने कार्यवाही व्हावी, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी गत दहा ते पंधरा वर्षांपासून सातत्याने लावून धरली जात आहे. यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली. पाठपुरावा केला. मात्र एवढा प्रदीर्घ काळ लोटूनही पुलाच्या उंची वाढवण्याच्या प्रश्नावर ठोस हालचाल होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
राजकारण बाजूला ठेवा : पुलाच्या उंचीचा हा विषय जनतेच्या सुरक्षिततेचा आणि दळणवळणाचा आहे. त्यामुळे राजकीय हेतू आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आमदार-खासदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. पावसाळ्यात मोर्णा नदीला पूर आल्यास पुलावरून पाणी जाण्याची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच या प्रश्नावर तोडगा काढणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवडणुकीवर बहिष्काराचा दिला होता इशारा विधानसभा निवडणुकीच्या काळात या प्रश्नावर नागरिकांनी बहिष्काराची भूमिका घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडून नागरिकांना पत्र देऊन बहिष्कार मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले. मात्र निवडणूक होऊनही आता बराच कालावधी उलटला आहे. पुलाच्या उंची वाढवण्याच्या प्रश्नावर ना प्रत्यक्ष काम, ना ठोस निर्णय, ना प्रभावी पाठपुरावा, अशी परिस्थिती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.