![]()
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशांचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. “तुला पैसे देतो, तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेतो, यात तुझा फायदा आहे,” असे सांगून चालकाला आमदाराच्या हत्येसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आमदाराला लक्ष्य करण्यामागे नेमका कोणाचा उद्देश होता, या कथित कटामागे आणखी कोणी व्यक्ती आहे का आणि आरोपींनी हा प्रस्ताव का दिला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महावीर चौक परिसरात नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरातील महावीर चौक परिसरात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी आमदारांचे वाहन चालक आनंद सुरवसे हे वाहनाजवळ थांबले होते. याचदरम्यान श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी हे दोघे चालकाजवळ आले. दोघांनी सुरवसे यांच्याशी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ठार करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. “तुला आम्ही पैसे देतो, तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल. पुढचं आम्ही बघून घेतो. यात तुझा फायदा आहे,” अशा आशयाचे कथित संभाषण आरोपींनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आमदाराच्या वाहन चालकाने मात्र या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्याने आरोपींना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाब विचारण्याआधीच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. चालकाने थेट पोलिसांत धाव घेतली घडलेल्या प्रकारानंतर वाहन चालक आनंद सुरवसे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांनी सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाराच्या हत्येसाठी वाहन चालकाला थेट पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप असल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. आरोपींचा नेमका उद्देश काय? या घटनेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोपींनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न का केला? त्यांचा आमदारांशी किंवा त्यांच्या राजकीय भूमिकेशी काही संबंध होता का? की या कथित कटामागे आणखी कोणीतरी व्यक्ती आहे? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. पोलिस आरोपींची चौकशी करून त्यांनी हा प्रकार स्वतःच्या पातळीवर केला होता की त्यांना कोणाकडून सूचना किंवा आर्थिक मदत मिळाली होती, याचा शोध घेण्याची शक्यता आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींची हालचाल आणि संबंधित व्यक्तींमधील पूर्वीचे संबंध यांचीही पडताळणी होऊ शकते. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण भाजपचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या विश्वासातील व्यक्तीलाच पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप झाल्याने या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आमदाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकार गंभीर मानला जात आहे. दरम्यान, केवळ चालकाला कथितरीत्या हत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला की प्रत्यक्षात आमदाराच्या हत्येचा काही कट आखण्यात आला होता, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या प्रकरणामागील नेमके कारण आणि संभाव्य सूत्रधार समोर येतात का, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा… ‘राष्ट्रवादी’ MP अन् PM यांची 25 दिवसांत चौथी भेट:सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात NCP शरद पवार गटाचे 8 खासदार मोदींना भेटले; कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या आठ खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. इथे सविस्तर वाचा
Source link
तुझ्या आमदाराला गोळ्या घाल, तुला पैसे देतो:भाजप आमदाराच्या ड्रायव्हरला हत्येची ऑफर, सोलापुरात खळबळ