Headlines

दीप्ती चंद्रचूड यांच्या ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ पुस्तकाचे प्रकाशन:सर्जनशील जीवनासाठी लेखनात सातत्य महत्त्वाचे- अरुणा ढेरे




ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी पुण्यात सांगितले की, अनुभवाचा जीव सर्जनशील आणि चैतन्यमय होण्यासाठी लेखनात सातत्य असणे आवश्यक आहे. त्या दीप्ती चंद्रचूड लिखित ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होत्या. हा प्रकाशन सोहळा सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी, प्रदीप चंद्रचूड आणि शोभा चंद्रचूड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. ढेरे म्हणाल्या की, जेन झी पिढी आणि मध्यमवयीन पालक यांच्यातील संवादाची उणीव भरून काढणे सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे. यासाठी जेन झी पिढीला समजून घेणारा, विचारी आणि विवेकी संवाद आवश्यक आहे. असे संवादी शब्द अनुभवाला सर्जनशील आणि चैतन्यमय बनवतात, पण त्यासाठी लेखनात सातत्य हवे. त्यांनी पुढे नमूद केले की, आजही स्त्रिया समाजजीवनात मध्ययुगीन, भूतकालीन आणि वर्तमानकालीन वास्तवाच्या विविध पातळ्यांवर संघर्ष करत आहेत. अशा वेळी दीप्ती चंद्रचूड यांच्यासारख्या संवेदनशील, मूल्यभान जपणारी आणि सकारात्मक दृष्टीची लेखिका महत्त्वाची ठरते. दीप्ती या आपल्या पित्याच्या रक्तवंश आणि ज्ञानवंश या दोन्ही परंपरा समर्थपणे चालवणाऱ्या स्त्रियांच्या परंपरेचा भाग आहेत. लेखिका दीप्ती चंद्रचूड यांनी हा दिवस आपल्यासाठी स्वप्नपूर्तीचा असल्याचे सांगितले. त्यांना वाचन-लेखनाचा वारसा आजोबांकडून मिळाला. औद्योगिक क्षेत्रात काम केल्यानंतरही शब्दांची ओढ कायम राहिली आणि त्यातूनच हे लेखन संकलित स्वरूपात पुस्तकात मांडले आहे. या लेखनातून जुन्या-नव्या संस्कृतीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. दीपक शिकारपूर यांनी एका उद्योजिकेचे लेखिकेत रूपांतर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दीप्ती यांनी लेखनात सातत्य राखावे आणि एखाद्या विशिष्ट विषयावर केंद्रित लेखन करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *