Headlines

संभाजीनगरात भेंडाळ्याच्या रूपाने आठव्या एमआयडीसीची भर पडणार:355 हेक्टरवर एमआयडीसीचा प्रस्ताव, अधिकाऱ्यांकडून जमिनीची पाहणी




छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातील औद्योगिक विस्ताराला नवी गती देण्यासाठी पुणे महामार्गावरील भेंडाळा येथे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ३५५ हेक्टर जमिनीवर नवीन एमआयडीसी साकारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ही संभाजीनगरातील आठवी एमआयडीसी असणार आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी नुकतीच भेंडाळा जमिनीची पाहणी केली. जमीन हस्तांतरणाबाबतच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठवला आहे. जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा आणि बिडकीन (ऑरिक सिटी) या प्रमुख औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योगांसाठी भूखंडांची मागणी सातत्याने वाढत आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्या तरी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक बडे उद्योगही वेटिंगवर आहेत. यावर पर्याय म्हणून प्रशासनाने भेंडाळा परिसरातील शेती महामंडळाच्या ३५५ हेक्टर (सुमारे ८८७ एकर) जमिनीची चाचपणी सुरू केली होती. शुक्रवारी एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, रमेशचंद्र गिरी तसेच इतर अधिकाऱ्यांनी जमिनीची पाहणी करून भौगोलिक रचना, मुख्य रस्त्याशी जोडणी व पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. शासकीय प्रक्रियेनंतर शहराला नवीन एमआयडीसी मिळेल. जागा उपलब्ध नसल्याने अनेक मोठे उद्योग वेटिंगवर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा दबदबा आहे. सध्या ऑरिकमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे मोठे उद्योग जागेअभावी वेटिंगवर आहेत. याशिवाय वाळूजमध्ये असलेल्या मोठ्या उद्योगांच्या साखळी उद्योगांनाही या ठिकाणी विस्ताराला संधी मिळणार आहे. जागा कृषी विभागाची असल्यामुळे हस्तांतरालाही फारसा वेळ लागणार नसल्याने प्रक्रिया तत्काळ मार्गी लागण्याची चिन्हे असल्याने शासकीय मंजुऱ्या पार पडाव्या लागतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *