Headlines

टेंडरचे राजकारण; दानवेंच्या रडारवर बड्या बजेटचीच कामे का- शिरसाट:आमदार दानवे यांनी सा.बां.व मनपात घेतली आढावा बैठक




शहरात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना, उबाठा नेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या रडारवर केवळ बड्या बजेट चीच कामे का आहेत, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आधी जिल्हा परिषदेच्या निधीवरून पालकमंत्र्यांना लक्ष्य करणे, त्यानंतर महापालिकेत प्रशासनाला धारेवर धरणे, आता थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०० कोटींच्या निविदा प्रक्रियेत “एन्ट्री’ करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणे हा दानवेंचा “पॅटर्न’ चर्चेचा विषय ठरला आहे. केवळ कोट्यवधींच्या निधीलाच टार्गेट करून नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. त्यामुळे शहरात “टेंडर’चे राजकारण चांगलेच तापले आहे. २०० कोटींच्या निविदेवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर : सोमवारी (१० ऑगस्ट) आमदार दानवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात बैठक घेऊन अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सामाजिक न्याय विभागांतर्गत उभारण्यात येणारे संत तुकाराम वसतिगृह, प्रशासकीय इमारत आणि बार्टी च्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याशिवाय शेंद्रा-बिडकीन आणि सावंगी-मिटमिटा रस्त्यांच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. मोठ्या निधीच्या कामांचाच आढावा घेण्याचा अर्थ काय? “आमदार अंबादास दानवे यांनी केवळ आरोप करू नयेत. तक्रारीत काही तथ्य असेल, तर निश्चितच चौकशी केली जाईल. मात्र, असे सतत आरोप करत राहिल्यास अधिकारी काम करण्यास धजावणार नाहीत. टेंडर काढण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. मग मोठ्या निधींच्याच कामांत दानवेंना चौकशी करण्याचे कारण काय.” – संजय शिरसाट, पालकमंत्री जिल्ह्यात सुरू असलेली लूट जनतेसमोर आणत आहोत “सामाजिक न्याय विभागाचे पावणेदोनशे कोटींचे काम ४ टक्के अबोव्ह भरून ३ दिवसांत मंजूर केले. एकीकडे सरकार पैसे देत नाही म्हणून ओरडायचे, दुसरीकडे लूट करायची, असा धंदा पालकमंत्र्यांनी सुरू केला आहे. मी फक्त आढावा बैठका घेऊन कामाची स्थिती जाणून घेतली. जिल्ह्यात सुरू असलेली लूट आम्ही जनतेसमोर आणत आहोत.” – अंबादास दानवे, आमदार पाणी, कचऱ्याच्या प्रश्नावर मनपात आढावा दानवे यांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन मनपातील विकासकामांवर चर्चा केली. नवीन योजनेतून ३० एमएलडी पाणी मिळूनही शहरात ७ ते ९ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, ४५ हजार प्रलंबित नळजोडण्या, रोजच्या ५०० मेट्रिक टन कचऱ्याचे व्यवस्थापन यावर त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. तसेच मिटमिटा सफारी पार्क आणि एन-६ येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानाच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. या वेळी गटनेते गणेश लोखंडे, माजी महापौर सुदाम सोनवणे उपस्थित होते. टार्गेट फक्त मोठा निधी? आमदार दानवे यांच्या या आढावा सत्रांमागे एक विशिष्ट पॅटर्न दिसून येत आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीवरून पालकमंत्र्यांवर आरोप केले होते. आता मनपा आणि बांधकाम विभागातील मोठ्या बजेटच्या कामांवर ते प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे दानवे यांना फक्त निधी बाबतचेच प्रश्न उपस्थित करून नेमके काय साध्य करायचे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *