Headlines

हिंगोली जिल्ह्यात पोलिस दलाकडून मिशन ऊर्जा उपक्रम:विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून दर्शविले आपत्कालीन क्रमांक




हिंगोली जिल्ह्यात मिशन ऊर्जा हा उपक्रमात मंगळवारी ता. 11 शहरातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून आपत्कालीन क्रमांक दर्शविले. यावेळी नागरीकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या मैदानावर सकाळी 10 वाजता रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील सर्वच शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहारातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली रॅली संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर आल्यानंतर त्या ठिकाणी मिशन ऊर्जा या उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधिक्षक लोढा यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. हिंगोली जिल्हयात सायबर सुरक्षा, रस्ते अपघात, महिलांची सुरक्षा याबाबींना प्राधान्य देऊन हा उपक्रम राबविला जात आहे. सायबर क्रमांक साठी 1930, आपत्कालीन क्रमांकासाठी 112 तर चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हेल्पलाईन क्रमांक सुरु आहेत. या आपत्कालीन क्रमाकांची नागरीकांना माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले जाईल. त्यानंतर जिल्हयातील आठवडी बाजारात विद्यार्थी पथनाट्य सादर करून या उपक्रमाची जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस दलाच्या या उपक्रमाचे अधिकाऱ्यांनी कौतूक केले. दरम्यान, यावेळी सुमारे 2 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून त्याद्वारे आपत्कालीन क्रमांक दर्शविले. मानवी साखळी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आहे. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *