![]()
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाईत येथील आश्रमशाळेत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्री झोपेत असताना सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आश्रमशाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची तीव्र मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आश्रमशाळा ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले मारोतराव कोवासे यांची आहे. एवढे अनुभवी नेते जर अशा बेजबाबदार पद्धतीने आश्रमशाळा चालवून लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर त्यांना माफी कशी द्यावी, असा संतप्त सवाल उपस्थित करत आदिवासी समाजातील मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या घटनेवर अत्यंत कठोर आणि संतप्त भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना म्हटले की, संबंधित शाळेत शिक्षक नसेल, वॉर्ड नसेल, शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा दिली जात नसेल तर या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा, असे आदेश दिले आहेत. तसेच रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित तपासणी करा. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, असेही निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. याचसोबत मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करावी. सर्व विभांगांना त्यात समाविष्ट करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके काय म्हणाले? माध्यमांशी बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले, तीन मुली दगावल्या आहेत. तीन मुलींवर उपचार सुरु आहेत. अनुदानित शाळेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. आदिवासी विकास विभागाचा निरीक्षक प्रत्येक महिन्याला शाळा तपासेल. महाराष्ट्रात अनुदानित आश्रम शाळा कार्यरत आहेत, त्या सर्व शाळांची त्रयस्थ संस्थेंकडून चौकशी करुन तपासणी केली जाईल. आज यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच पुढे बोलताना अशोक उईके म्हणाले, अनुदानित आश्रम शाळेत प्रकार घडला त्यात मुख्याध्यापक, शिक्षक नव्हते फक्त दोन कर्मचारी होते. संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. काल चर्चा केली असता, अनुदानित आश्रमांचे मूल्यमापन करत व्यवस्था नसलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येईल. 1992 पासून गडचिरोली जिल्ह्यातील जलतराईत ही आश्रम शाळा आहे. या शाळेचे संचालक खासदार राहिले आहेत, आमदार राहिले आहेत. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण:अनुदान लाटणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करणार; आशिष जयस्वाल यांचा कडक इशारा गडचिरोली येथील एका खासगी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. या घटनेची पाहणी केल्यानंतर हा केवळ अपघात नसून संस्थाचालक आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, गायब असलेले मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जयस्वाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आश्रमशाळांच्या विदारक स्थितीवर आणि गलथान कारभारावर सविस्तर माहिती दिली. इथे सविस्तर बातमी वाचा
Source link
गडचिरोलीत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू:मुख्यमंत्र्यांचे आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे आदेश, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?