Headlines

शिवाजी मित्र मंडळ राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम:भवानी पेठेतील मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी पुणे विभागाचा मान पटकावला




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पुणे शहरातील तब्बल १६५ गणेश मंडळे आणि ३५ शाळांनी सहभाग घेतला होता. सहभागी मंडळे व शाळांना मिळून सुमारे दोन लाख १७ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुणे शहरातील विविध गणेश मंडळांनी सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक विषयांवर आधारित आकर्षक देखावे सादर केले होते. शिवाजी मित्र मंडळाच्या देखाव्याला परीक्षकांनी विशेष पसंती दिली. नवरा मित्र मंडळाने द्वितीय, तर एंडवणातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाला चौथा क्रमांक मिळाला. स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. यावेळी शिवाजी मित्र मंडळाला ‘सोलर गार्डन’ देखाव्यासाठी ५१ हजार रुपये, नवरा मित्र मंडळाला ‘फायर इंडिया’ मूकनाट्यासाठी ४५ हजार रुपये, एकता मित्र मंडळाला ‘अंबाबाईच्या’ देखाव्यासाठी ४० हजार रुपये, श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाला ‘हरवलेली पाखरे’ सजावटीसाठी ३५ हजार रुपये आणि संयुक्त प्रसाद मित्र मंडळाला ‘कृषी अवशेषांपासून गणपती’ साकारण्याच्या देखाव्यासाठी ३० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण, मध्य (उत्तर) आणि मध्य (दक्षिण) अशा विविध विभागांमध्येही देखाव्यांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, जय गणेश भूषण पुरस्कार, महोत्सवी वर्ष साजरी करणारी गणेश मंडळे, शालेय विभाग, प्रोत्साहनपर चित्रकला शिक्षक, कलाकार आणि सोसायटी विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचाही गौरव केला जाईल. स्पर्धेच्या परीक्षक मंडळात विवेक खटावकर, मधुकर जिनगिरे, सतीश मराठे, किशोर सरपोतदार, दिगंबर गायकवाड, संदीप शिंदे, विनायक भायात, ओंकार कळकणकर आणि अजित कुंभारकर यांचा समावेश होता. परीक्षकांनी मंडळांच्या देखाव्यांसह सामाजिक संदेश, सजावट आणि गणेशोत्सवातील उपक्रमांचे परीक्षण करून निकाल निश्चित केला. आमदार हेमंत रासने यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुण्याला १३५ वर्षांची गणेशोत्सव परंपरा आहे आणि आता हा सण १४० देशांमध्ये साजरा केला जातो. देवस्थानांना ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला जातो, त्याचप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रथमच हा दर्जा मिळाला आहे. यासोबतच, त्याला राज्य गणेशोत्सव दर्जा देखील प्रदान करण्यात आला आहे. ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *