![]()
डीजे डान्स आणि डीजे लावणीच्या नावाखाली महाराष्ट्राच्या संस्कृतीची विटंबना करणारे अशोभनीय कार्यक्रम तातडीने बंद करावेत, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी केली आहे. ‘कला हवी, अश्लीलता नको; आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष आदेश हवा,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमांमध्ये अशोभनीय अंगविक्षेप, पैशांची उधळण, प्रेक्षकांना स्टेजवर बोलावणे आणि महिला कलाकारांना लज्जास्पद वाटतील असे सादरीकरण होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. प्रशासनाने याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने न पाहता महिला व बालसुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अशा कार्यक्रमांवर तातडीने बंदी घालण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे, सर्वात्मक महारुद्र ट्रस्ट व राष्ट्रीय महाकाल सेना पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ शिंदे, मनसे पुणे शहर सचिव सोनाली पोकळे, दिशा फाउंडेशनच्या अर्चना चंदनशिवे तसेच मराठी रंगभूमी निर्माता महासंघ व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. लावणी ही महाराष्ट्राची समृद्ध आणि अभिमानास्पद लोककला आहे. मात्र, लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य व अशोभनीय सादरीकरण करून या कलेची बदनामी करणाऱ्यांना थारा देऊ नये, असे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. पारंपरिक आणि गुणवंत लावणी कलाकारांना सन्मान, योग्य व्यासपीठ, काम आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. शासनाने अशा कार्यक्रमांवर प्रभावी नियंत्रण ठेवतानाच अस्सल लावणी, लोककला आणि लोककलाकारांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. अभिनेत्री टीना शर्मा घेवारे यांनी स्पष्ट केले की, लावणीमध्ये अभिनय, नृत्य, भावभावना आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुंदर संगम आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव आणि अशोभनीय सादरीकरण करून या समृद्ध कलेला बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही स्वतः कलाकार आहोत आणि कलेचा सन्मान राखणे ही आमची जबाबदारी आहे. गुणवंत आणि पारंपरिक लावणी कलाकारांना योग्य व्यासपीठ, सन्मान व संधी मिळाली पाहिजे; अश्लीलतेला कोणतेही स्थान मिळता कामा नये. अश्लील कार्यक्रम करायचे आणि त्याला पुणेकरांची ओळख जोडायची, हे अजिबात चालणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पुणेकर हे नाव शिक्षण, संस्कृती, प्रबोधन आणि विचारांची ओळख आहे. या नावाला बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्यांची जी अधिकृत ओळख आहे, त्यांनी आपले खरे नाव-आडनाव वापरावे. पुणेकरांच्या नावाच्या आडून अश्लीलतेचा बाजार मांडू देणार नाही. पुण्याची संस्कृती आणि पुणेकरांचा स्वाभिमान जपण्यासाठी अशा प्रकारांविरोधात ठामपणे आवाज उठवला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
Source link
डीजे लावणीतील अश्लीलतेवर बंदी घाला, महामंडळाची मागणी:'कला हवी, अश्लीलता नको'; शासनाने थेट आदेश द्यावा