Headlines

कुंभमेळ्याच्या नावाने 500 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर:9 ठेकेदारांकडून 65 लाख उकळले, नाशिक पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले




नाशिक कुंभमेळ्यासाठी ३२ हजार कोटींची कामे होणार आहेत. त्याचा फायदा घेऊन गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यात काही ठकांनी चक्क नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट सही ठोकून ५०० कोटींचे बनावट टेंडर काढले. एवढेच नव्हे तर ९ ठेकेदारांकडून काम मिळवून देण्यासाठी ६५ लाख रुपये उकळून मूळ वर्क ऑर्डरमध्ये कॉपी-पेस्ट करून बनावट वर्क ऑर्डरही दिली. या वर्क ऑर्डर घेऊन ठेकेदार सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे गेल्यानंतर फसवणूक उघड झाली. यात एक ठेकेदार संभाजीनगरचा आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी जामनेरातून तीन, तर धुळ्याजवळून एक अशा चौघांना ताब्यात घेतले. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनीच सोमवारीच ४०० ते ५०० कोटींचा टेंडर घोळ झाल्याचे म्हटले होते. ३० एप्रिलला गेडाम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ऑफलाइन पद्धतीनेही काही कामे मंजूर होत असल्याचा घेतला फायदा नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामे सुरू आहेत. या कामांची मंजुरी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सुरू आहे. त्याचा फायदा घेत ठकांनी पोलिसांना दोन वेळचे जेवण, नाष्टा, ब्लँकेट आणि पिण्याचे पाणीपुरवठ्याचे हुबेहुब सरकारी ऑफलाइन बनावट टेंडर काढले. ते ठेकेदारांच्या वर्तुळात पद्धतीशीरपणे पोहोचवले. काही ठेकेदार त्यांच्या जाळ्यात येताच त्यांना काम मिळवून देण्यासाठी ६५ लाख रुपये उकळले. पोलिस तपासात गंडा घालण्याची ही रक्कम वाढू शकते. सिंहस्थ प्राधिकरणाच्या मूळ वर्क ऑर्डरमध्ये कॉपी पेस्ट करून बनावट वर्क ऑर्डर दिली. ‘कमिशन’ची ऑडिओ क्लिप सिंहस्थ प्राधिकरणाच्या लेटरहेडवर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून कार्यारंभ आदेश काढल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहस्थानिमित्त जवळपास ३२ हजार कोटी रुपयांची कामे होणार आहेत. मार्च महिन्यात मंत्रालयातील लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी विलास लाड यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. या क्लिपमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यवहार आणि ‘कमिशन फिक्स’ झाल्याचे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर लगेचच या बोगस वर्क ऑर्डरचे प्रकरण पुढे आले होते. मंत्री गिरीश महाजनांच्या घराजवळ संशयित ताब्यात गिरीश महाजन यांचे निवासस्थान असलेल्या बजरंगपुरा भागातील एक, तर पाचोरा रोडवरील दोन संशयितांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले. ‘आम्ही नाशिकचे पोलिस असून बनावट वर्क ऑर्डरप्रकरणी तुमच्या मुलाला ताब्यात घेत आहोत,’ असे पथकातील कर्मचाऱ्यांनी डोंगरी महाराजनगरातील संशयिताच्या कुटुंबीयांना सांगितले. यातील एक जण धुळे मनपाचा शिक्षक आहे. या दोघांनी मिळून एका किराणा दुकानदाराच्या खात्यावर ठेकेदाराकडून ऑनलाइन ३० लाख रुपये घेतल्याची चर्चाही समोर आली आहे. एआयच्या मदतीने अशी बनावट वर्क ऑर्डर तयार करणे सहज शक्य तज्ज्ञांच्या मते एआयच्या मदतीने अशी बनावट वर्क ऑर्डर तयार करणे सहज शक्य आहे. त्यातील अटी, शर्ती आणि इतर नियमावलीही भामटे तयार करू शकतात. मात्र, या प्रकरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी वर्क ऑर्डरवर बनावट मेल आणि विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल सही केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *