Headlines

बिल्डर असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक:पुणे पोलिसांनी आरोपीला चंद्रपूरमधून पकडले




चंदननगर पोलिसांनी बिल्डर असल्याचे भासवून १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला चंद्रपूर येथून अटक केली आहे. सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३८, रा. म्हसोबाची वाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झेंडे याने ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान चंदननगर परिसरात एका महिलेसोबत संगनमत करून सोन्याची खरेदी करण्याचे आमिष दाखवले. त्याने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून १०० ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्किटे घेतली. या बिस्किटांची किंमत सुमारे १४ लाख ७८ हजार ७६० रुपये होती. आरोपीने पैसे देण्यासाठी एका बँकेचा खाते क्रमांक दिला होता. मात्र, त्या खात्यात पैसे नसतानाही त्याने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी चंद्रपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने तातडीने चंद्रपूर गाठून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने फसवणुकीतून मिळालेली सोन्याची बिस्किटे इंदापूर येथील एका सोनाराला विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यातून मिळालेल्या रोख रकमेपैकी ८ लाख ५० हजार रुपये जप्त केले आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, आरोपीने प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे भासवून पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतील कार व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी भिगवण आणि विमानतळ पोलिस ठाण्यांतही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *