![]()
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके जंतर-मंतर आंदोलनानंतर पुढील आंदोलनांची रूपरेषा ठरवण्यात मग्न आहेत. ‘दिव्य मराठी’शी विशेष संवाद साधताना दिपके यांनी स्पष्ट केले की, सध्या सीजेपीला राजकीय पक्ष बनवणार नाही. पक्ष बनवताच तो सहज फोडला जाईल. दिपके यांच्याशी झालेल्या संवादातील प्रमुख अंश… सीजेपीला राजकीय पक्ष बनवणार का? कोअर कमिटीत चर्चा झाली. पण राजकारणात उतरणे घाई ठरेल. मोठे पक्ष टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहेत. आम्ही तर अजून खूप छोटे आणि नवीन आहोत. पक्ष बनवला तर खूप ऊर्जा आणि वेळ तो वाचवण्यात जाईल. सध्या दबाव गट म्हणूनच राहू. लोकशाही केवळ पक्ष आणि निवडणुकांपुरती मर्यादित नाही. यामध्ये जनता, दबाव गट, नागरी समाज, प्रसारमाध्यमे आणि न्यायपालिकेचीही भूमिका असते. एखाद्या पक्षाने सोबत येण्याचा प्रस्ताव दिला का? नाही. वेगवेगळ्या पक्षांचे लोक शुभेच्छा द्यायला आले होते. मी सर्वांचा सन्मान करतो. राहुल गांधी यांची भेट झाली का ? काँग्रेसकडून पवन खेडा भेटले होते. राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले नाही. जर त्यांना भेटण्याची संधी मिळाली तर नक्की भेटू. भाजपच्या लोकांना भेटायचे असेल तर आम्ही त्यांनाही भेटायला तयार आहोत. निवडणूक प्रक्रिया व ईव्हीएमबद्दल काय सांगाल? युरोप-अमेरिकेसारख्या देशांमध्ये निवडणुका मतपत्रिकेद्वारे होतात. कोणतेही तंत्रज्ञान हॅक किंवा मॅनिपुलेट केले जाऊ शकते. त्यामुळे ईव्हीएममध्येही फेरफार शक्य आहे. मला वाटते की, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर मतदार यादीत गडबड केली जात आहे. आधी मतदार सरकार निवडत होता, आता सरकार ठरवत आहे की मतदार कोण असेल. बंगालमध्ये 27 लाख खऱ्या मतदारांचे प्रकरण समोर आहे. असे वाटते की, समस्या केवळ ईव्हीएम नाही. मतदार यादीतील गडबडही लोकशाहीला कमकुवत करेल. तुम्ही प्रसारमाध्यमांवरही प्रश्न उपस्थित केले? बहुतांश मीडिया संस्थांनी आपला अजेंडा निश्चित केला आहे. पण ‘दिव्य मराठी’च्या निष्पक्ष पत्रकारितेबद्दल आमच्या मनात विशेष स्थान आहे. यासाठी मी मनापासून आभार मानतो. तुम्हाला ‘केजरीवाल पार्ट-2’ म्हटले जातेय? मी आम आदमी पक्षासोबत काम केले हे कधीही लपवले नाही. जुने ट्विट्सही डिलीट केले नाहीत. केजरीवालांच्या कामांनी मी प्रभावित होतो. आता सीजेपीसाठी काम करतोय. काही जण मला ‘आप’शी जोडतात तर काही आरएसएस-भाजपशी. मी इतकेच सांगेन की आधी आपापसात ठरवून घ्या. कोअर कमिटीत मित्रांना पदे दिल्याचे आरोप आहेत? कोअर कमिटीत अशा लोकांना घेतले, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात काम केलेय. कोणी पत्रकारितेत काम केले, कोणी पेपरफुटीच्या मुद्द्यावर, कोणी धोरण आणि बजेटवर तर कोणी शेतकरी आंदोलनात काम केले आहे. यापैकी अनेक लोकांना मी आधी ओळखतही नव्हतो. सप्टेंबरपासून देशभरात जाण्याची काय योजना आहे?
सप्टेंबरपासून ‘क्या बोलती पब्लिक’ कार्यक्रम सुरू करू. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन समस्या आणि अपेक्षा जाणून घेऊ. यातून ज्या गोष्टी समोर येतील, त्यांच्या आधारावर मॉडेल अजेंडा (धोरण) तयार करू. तुमच्यावर अहंकारी असल्याचा आरोप आहे? जे माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली. आमच्या टीमचे सदस्य त्यांच्यासोबत बसले. त्यांची मागणी होती की, त्यांना कोर टीममध्ये सामील करून घ्यावे, पण सर्वांना त्यात सामील करू शकत नाही. संघटनेचा विस्तार होईल तेव्हा इतर लोकांनाही जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाऊ शकते. सध्याच्या पक्षांवर आणि व्यवस्थेवर विश्वास का कमी झाला? मतदार एखाद्या विचारधारेला आणि पक्षाला मत देतो, पण नंतर निवडून आलेला प्रतिनिधी दुसऱ्या पक्षात जातो. सरकार एका पक्षाचे निवडले जाते आणि फोडाफोडीनंतर परिस्थिती बदलते. यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जातो. आम्हाला वाटते की, लोकशाहीला केवळ पक्ष आणि निवडणुकांपुरती मर्यादित न ठेवता जनतेचा सहभाग वाढवला पाहिजे. पुन्हा अमेरिकेला जाणार का? भारतातच राहीन. इथेच काम करेन आणि पूर्ण वेळ सीजेपीला देईन. धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाकडे कसे पाहता? राजकारणाचे लक्ष आणि राजकीय चर्चा बदलली पाहिजे. निवडणुकीत धर्माशी संबंधित विधानांऐवजी प्रश्न हा असायला हवा की शिक्षण व्यवस्था कशी सुधारणार, नोकरी कशी मिळणार, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा कशा सुधारणार. पुढे काय करणार हे सांगितले पाहिजे. राजकारणात कामाची चर्चा व्हायला हवी आणि जनतेच्या मनातील गोष्टी बोलाव्यात. देशातील जेन-झी (Gen-Z) च्या भूमिकेकडे कसे पाहता? या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय कोणाचा राजीनामा हा नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तरुणांनी आपल्या मनातील भीती संपवून सरकारला प्रश्न विचारले आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. लोकशाहीत कोणीही सरकारला प्रश्न विचारण्यास किंवा आपले मत मांडण्यास घाबरू नये. तरुण, समर्थकांसाठी काय संदेश? सर्वांचे आभार. लोकांच्या पाठिंब्याशिवाय आंदोलन यशस्वी होत नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे- रातोरात कोणालाही हिरो बनवू नका. लोकशाहीत कोणत्याही एका व्यक्तीला देश, संविधान आणि संस्थांपेक्षा मोठे बनवले जाऊ नये. सरकार आश्वासनांपासून मागे हटले तर? सरकारने असा विचार करू नये की, विद्यार्थी व तरुणांचा राग शांत झाला आहे. समस्या सुटल्या नाहीत तर ते पुन्हा रस्त्यावर उतरतील. जंतर – मंतर आंदोलनाचा ‘सीझन-2’ लवकरच : दिपके
नवी दिल्ली | अभिजित दिपके यांनी सांगितले की, जंतर-मंतर आंदोलनाचा ‘सीझन-2’ लवकरच सुरू होईल. त्यांनी आरोप केला की, दिल्लीत बुधवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आधी जागा मिळाली नाही. बुक केलेला बँक्वेट हॉल दिला नाही. हॉलचालकांनी ‘वरचा दबाव’ म्हटले. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप दिपके यांनी केला. ते म्हणाले, ‘तुम्ही कितीही घाबरवा, आम्ही घाबरणार नाही.’
Source link
सीजेपी सध्या राजकीय पक्ष बनणार नाही,पक्ष बनवताच सहज फोडला जाईल:अभिजित दिपके म्हणाले- सप्टेंबरपासून ‘क्या बोलती पब्लिक’ कार्यक्रम… लोकांशी संवाद साधून अजेंडा बनवणार