![]()
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या खोडसाळपणामुळे मोठी खळबळ उडाली. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चढण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान ५५ वर्षीय प्रवाशाने “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे” असे सांगितल्याने सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. या घटनेमुळे टेकऑफसाठी सज्ज असलेले विमान त्वरित थांबवण्यात आले आणि संपूर्ण सुरक्षा प्रक्रिया पुन्हा राबवण्यात आली. नेमका प्रकार कसा घडला? ही घटना ९ ऑगस्ट रोजी घडली. इंडिगो एअरलाईन्सचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान उड्डाणासाठी सज्ज होते. टर्मिनलच्या बोर्डिंग गेटवर एअरलाईनचे सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश राजभर आणि रवींद्र रोकडे हे प्रवाशांच्या हातातील सामानाची (हँडबॅग) नियमित तपासणी करत होते. नियमानुसार त्यांनी एका ५५ वर्षीय प्रवाशाला, अनुज सुवर्णा याला, बॅगेत काडेपेटी, लायटर, कात्री किंवा इतर कोणतीही बंदी असलेली वस्तू आहे का? असा सामान्य प्रश्न विचारला. त्यावर या प्रवाशाने अत्यंत निष्काळजीपणे आणि खोडसाळपणे उत्तर दिले की, “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे.” सुरक्षा यंत्रणांची तातडीची कारवाई अन् विमानाची झडती ‘बॉम्ब’ हा शब्द ऐकताच विमानतळ प्रशासनाचे कान टवकारले. कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) पाचारण केले. CISF जवानांनी तातडीने या प्रवाशाला विमानातून खाली उतरवून आपल्या ताब्यात घेतले. सुरक्षेचा प्रोटोकॉल म्हणून संपूर्ण विमान तातडीने रिकामे करण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) विमानाची, कार्गोची आणि सर्व प्रवाशांच्या सामानाची कित्येक तास अत्यंत बारकाईने तपासणी केली. सुदैवाने, या सखोल तपासणीत कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळली नाही. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि विमान दिल्लीकडे रवाना करण्यात आले. ‘फक्त मस्करी करत होतो…’; प्रवाशाला पोलिसांची नोटीस या धक्कादायक घटनेनंतर CISF ने आरोपी अनुज सुवर्णा याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. विमानतळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आपण ही गोष्ट केवळ ‘मस्करी’ म्हणून बोललो होतो, आपला कोणताही वाईट हेतू नव्हता, असा दावा आरोपीने केला. पोलिसांनी त्याला सध्या समज देऊन सोडले असले, तरी या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे. हेही वाचा.. आता रोज होणार एअर इंडिया पायलट्सची ड्रग टेस्ट: फुकेट-दिल्ली फ्लाइट अपघातानंतर निर्णय; पायलट नशेत होता, दोन अहवालांमध्ये पुष्टी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्व वैमानिकांची दररोज ड्रग्ज चाचणी केली जाईल. दोन्ही एअरलाईन्सनी आजपासून ही चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयच्या सूत्रांनुसार, यामध्ये कोणत्याही वैमानिकाने प्रतिबंधित औषधे किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले आहे का, याचीही तपासणी केली जाईल. दोन्ही एअरलाईन्समध्ये 5 हजारांहून अधिक वैमानिक आहेत. सविस्तर वाचा
Source link
विमानतळावर 'बॉम्ब'ची मस्करी पडली महागात!:एका वाक्यामुळे थांबवले विमानाचे उड्डाण, प्रवाशाला पोलिसांची नोटीस