Headlines

शास्त्रीनगर ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा:पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याचे आदेश




पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शास्त्रीनगर चौकातील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचा गुरुवारी आढावा घेतला. पुणे ते अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. आयुक्तांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना कामाला गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शास्त्रीनगर चौक परिसरात नगर रोड, गोल्फ चौक, कल्याणीनगर आणि गुंजन चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मोठा भार असतो. यामुळे या चौकात वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने ७५० मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे. याशिवाय, आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या मार्गावर सुमारे ७०० मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. आयुक्तांनी ग्रेड सेपरेटरचे काम पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्प मार्च २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नगर रोड, कल्याणीनगर, गुंजन चौक, गोल्फ चौक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे वाहतूक प्रवाह अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान वाहतूक पोलीस विभाग आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह मुख्य अभियंते, उपायुक्त, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *