![]()
मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबतच आता सीएनजीच्या वाढत्या दरामुळे वाहनधारकांवर आर्थिक बोजा पडत आहे. शहर व जिल्ह्यात हजारो वाहने सीएनजीवर धावत असून, गेल्या चार महिन्यांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो तब्बल आठ रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सीएनजीचे मदर स्टेशन सुरू होऊनही ही दरवाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच वर्षांपासून सीएनजीचा पुरवठा सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढली आहे. सध्या ही संख्या सुमारे ३२०० वाहनांवर पोहोचली आहे. सुरुवातीला सीएनजीचा दर प्रतिकिलो ९० रुपये होता. त्यानंतर सुमारे वर्षभर दरात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, त्यानंतर हळूहळू सीएनजीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. पूर्वी अमरावतीला सीएनजी लातूर जिल्ह्यातून टँकरद्वारे आणला जात होता. त्यामुळे वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भार पडत होता. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बोरी येथे सीएनजीचे मदर स्टेशन सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातच सीएनजीचा पुरवठा उपलब्ध झाला असून, शहरापासून हे मदर स्टेशन सुमारे ४५ ते ५० किलोमीटर अंतरावर आहे. मदर स्टेशन जिल्ह्यात सुरू झाल्यानंतर सीएनजीचे दर कमी होतील, अशी अपेक्षा होती. अदानी टोटल गॅसच्या अधिकाऱ्यांकडूनही सुरुवातीला वाहतूक खर्च कमी झाल्याने त्याचा फायदा दरांमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात दर कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीवर अवलंबून असलेल्या वाहनचालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. मूळ किमतीत वाढ झाल्यामुळे दर वाढले ^केंद्र सरकारने देशपातळीवर सीएनजीच्या मूळ किमतीत वाढ केली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातही सीएनजीचे दर वाढले आहेत. – योगेशकुमार पारधी, प्रमुख, विदर्भ, अदानी टोटल गॅस. सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या अशा प्रकारे अवघ्या चार महिन्यांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ८ रुपयांची वाढ झाली असून, सीएनजीने प्रथमच प्रतिकिलो १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
Source link
4 महिन्यांत 8 रुपयांनी महागला सीएनजी; प्रथमच ओलांडली शंभरी:मदर स्टेशन जिल्ह्यातच असूनही प्रतिकिलो 103.78 रुपये दर, वाहनचालकांच्या खर्चात वाढ