![]()
पुणे येथे राज्यातील पहिल्या मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार हे कार्यालय सुरू झाल्याचे सांगितले. कोथरूड येथील रिव्होलेशन मॉलमधील या कार्यालयाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. बावनकुळे म्हणाले की, मुद्रांक व नोंदणी विभागाकडे येणारा प्रत्येक नागरिक हा आमचा ग्राहक आहे. रजिस्ट्री करणारे, दस्त लिहून देणारे आणि दस्त लिहून घेणारे यांना उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात, यासाठी कार्यालये सुसज्ज आणि दर्जेदार असावीत, ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे. त्यानुसारच हे पहिले मॉडेल कार्यालय पुण्यात सुरू झाले आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे. आता जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या मालमत्तेची दस्त नोंदणी त्याच जिल्ह्यातील कोणत्याही सक्षम नोंदणी कार्यालयात करता येते. यामुळे नागरिकांना मालमत्ता ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करण्याची सक्ती राहिलेली नाही. पुणे जिल्ह्याचे उदाहरण देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, बारामतीची रजिस्ट्री पुण्यात करता येते. त्याचप्रमाणे इंदापूर, दौंड, जुन्नर, मावळ, खेड किंवा पुणे जिल्ह्यातील कोणत्याही भागातील मालमत्तेची नोंदणी नागरिकांना त्यांच्या सोयीच्या कार्यालयात करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
मॉडेल कार्यालयाच्या संकल्पनेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात चांगले वातावरण, व्यवस्थित प्रतीक्षा व्यवस्था आणि आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांना सन्मानपूर्वक सेवा मिळावी, यासाठी या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. नागरिकांना कार्यालयात वारंवार येण्याची गरज पडू नये, अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध व्हाव्यात आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विभागाचे डिजिटायझेशन करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Source link