Headlines

गिरणी मैदानाच्या विकासकामाला गती:सोमवारपासून सपाटीकरण सुरू, अधिकाऱ्यांनी केली पाहणी




गिरणी मैदानाच्या विकासकामाला आता गती मिळाली आहे. रोशन गेट परिसरातील या मैदानाची विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सोमवारपासून मैदानाचे सपाटीकरण करून ते मुलांसाठी खेळण्यायोग्य बनवण्याचे काम सुरू होणार आहे. रोशन गेट आणि परिसरातील दाट लोकवस्ती लक्षात घेता, येथील मुलांना खेळण्यासाठी योग्य व सुरक्षित जागेची मोठी गरज होती. विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर आणि प्रभाग क्रमांक १३ मधील एआयएमआयएम (AIMIM) नगरसेवकांनी गिरणी मैदानाच्या विकासाचा प्रश्न सातत्याने प्रशासनासमोर मांडला होता. आजच्या पाहणीदरम्यान, अधिकाऱ्यांनी मैदानाची सद्यस्थिती जाणून घेतली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारपासून सपाटीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच, परिसरातील नागरिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन लवकरच पाण्याच्या टाकीच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गिरणी मैदान विकसित झाल्यानंतर रोशन गेट आणि आजूबाजूच्या दाट वस्तीतील मुलांना आणि युवकांना खेळण्यासाठी सुरक्षित व योग्य जागा उपलब्ध होईल. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, नगरसेवक उसामा सय्यद आणि प्रभागातील नगरसेवकांनी जनतेच्या या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच या विकासकामाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. जनतेच्या मूलभूत सुविधा, मुलांचे भविष्य आणि परिसराचा सर्वांगीण विकास यासाठी पाठपुरावा पुढेही सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *