![]()
मराठी काव्यविश्वात आपल्या संवेदनशील आणि सुसंस्कृत लेखणीने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर धामणस्कर यांचे आज निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक अत्यंत ऋजू, विचारवंत आणि शब्दांचे मर्म जाणणारा ज्येष्ठ कवी गमावला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. अहमदाबाद ते डोंबिवली: असा होता जीवनप्रवास २६ ऑक्टोबर १९३० रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे द. भा. धामणस्कर यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय रिझर्व बँकेत दीर्घकाळ सेवा केली आणि १९८८ मध्ये ते तिथून निवृत्त झाले. सप्टेंबर १९६० पासून ते डोंबिवलीचे रहिवासी होते. डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन विश्वाशी त्यांचे घट्ट नाते होते. डोंबिवलीच्या ‘काव्यरसिक मंडळाचे’ ते सुरुवातीपासूनचे सक्रिय सदस्य होते. सतराव्या वर्षी पहिली कविता धामणस्कर यांनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी आपली पहिली कविता लिहिली. त्यानंतर ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘कविता-रती’, ‘दीपावली’, ‘हंस’, ‘मराठवाडा’ अशा अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आणि त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ग्रंथालीच्या ऐतिहासिक ‘दशकाची कविता’ या संकलनात समाविष्ट असलेल्या दहा निवडक कवींमध्ये त्यांचा सन्मानपूर्वक समावेश होता. साहित्य अकादमीच्या साठोत्तरी मराठी कवितेच्या संकलनात, तसेच ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय कवितायें १९८३’ या विशेष ग्रंथात त्यांच्या ५ कवितांचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. पाठ्यपुस्तकातून पिढ्यांवर संस्कार धामणस्कर यांच्या कवितांनी केवळ प्रगल्भ वाचकांनाच नव्हे, तर विद्यार्थी वर्गालाही भुरळ घातली. महाराष्ट्र सरकारच्या इयत्ता १० वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात त्यांची ‘वस्तू’ ही मानवी मूल्यांची जपणूक करणारी कविता समाविष्ट आहे. याशिवाय, कर्नाटक सरकारच्या मराठी पाठ्यपुस्तकातही त्यांची ‘कंदील विकणारी मुले’ ही कविता अभ्यासासाठी ठेवण्यात आली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे निमंत्रित कवी म्हणून त्यांनी अनेक मंचांवरून आपल्या कवितांचे सादरीकरण केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही त्यांचे कवितावाचन प्रचंड लोकप्रिय ठरले. त्यांच्या निधनामुळे मराठी काव्यक्षेत्रातील एक समृद्ध पर्व संपले असून, साहित्य वर्तुळातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हेही वाचा.. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच:2024च्या विधानसभा निकालाने लोकन्यायालयाचे शिक्कामोर्तब, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल असा विश्वास- फडणवीस सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालय यावर आपला निर्णय देईलच, मात्र त्यापूर्वीच 2024च्या विधानसभा निवडणुकीत ‘लोकन्यायालयाने’ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असण्यावर शिक्कामोर्तब केले आहे,” असे ठाम मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षनाव, राहुल गांधींवर टीका, चाकण एमआयडीसीचा प्रश्न आणि जातनिहाय जनगणना अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. सविस्तर वाचा..
Source link
ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर काळाच्या पडद्याआड:वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मराठी साहित्यविश्वावर शोककळा