Headlines

इस्रोचा अभ्यासदौरा यशस्वी:41 बालवैज्ञानिकांचे नागपुरात पालकमंत्र्यांकडून दिमाखदार स्वागत




भंडारा जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) विशेष अभ्यासदौरा यशस्वीपणे पूर्ण केला. नागपूर विमानतळावर त्यांचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्वतः उपस्थित राहून या बालवैज्ञानिकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, भंडारा डायटचे प्राचार्य राजेंद्र रुद्रकार आणि शिवलिंग पडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सर्व विद्यार्थ्यांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या इस्रो भेटीचा अनुभव जाणून घेतला. अभ्यासदौऱ्यादरम्यान काय पाहिले, अंतराळ विज्ञानाविषयी कोणती नवीन माहिती मिळाली आणि वैज्ञानिकांकडून काय शिकायला मिळाले, याबाबत पालकमंत्र्यांनी विचारणा केली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने इस्रोतील आपले अविस्मरणीय अनुभव त्यांच्यासमोर मांडले. या विशेष शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना इस्रोच्या प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान केंद्रांना थेट भेट देण्याची संधी मिळाली. त्यांनी अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान आणि भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमांच्या तांत्रिक पैलूंची माहिती प्रत्यक्ष वैज्ञानिकांकडून घेतली. इस्रोतील वैज्ञानिक आणि त्यांची कार्यपद्धती जवळून समजून घेतल्याने आपल्या ज्ञानात खूप मोठी भर पडल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *