![]()
कन्नड तालुक्यातील शैक्षणिक व गुणवत्तेचे वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी ‘एएलसी सोशल फाउंडेशन’चे संस्थापक आदित्यवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्यावतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, नवोदय, एनएमएमएस, एमटीएसई आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत जनजागृती व मार्गदर्शन सत्रे राबवली जात आहेत. या मोहिमेअंतर्गत नादरपूर, मोहाडी, कवडीरजनी, जवखेडा बुद्रुक, महादेववाडी, जवखेडा खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळा आणि घासी बाबा माध्यमिक विद्यालय जवखेड बुद्रुक येथील शाळांना सदिच्छा भेट देण्यात आली. या दौऱ्यादरम्यान नादरपूर येथील जि. प. शाळेत आयोजित कार्यक्रमात आदित्यवर्धन जाधव यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद करतानाच त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी जाधव यांच्याशी मनमोकळा संवाद साधत विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांची प्रगती पाहून जाधव यांनी विशेष समाधान व्यक्त केले. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. या उपक्रमास जगन जंगले, बाबुराव बनकर, शालेय समिती अध्यक्ष, ग्रामस्थ व माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नादरपूर शाळेच्या वतीने आदित्यवर्धन जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या मार्गदर्शक भेटीबद्दल सर्व स्तरांतून जाधव व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषी कदम, कार्तिक वाळुंजे, यश पाटील, निखिल चव्हाण, पुष्कर पवार आणि अनुष्का सौंदाणकर या फाउंडेशनच्या टीम सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
तालुक्यात आदित्यवर्धन जाधव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष मोहिमेतून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबद्दल दिली माहिती