![]()
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. १३) शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून गेले. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात पार पडली. ऐतिहासिक रंगमहाल येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज घेत विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजविणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव करून देणे आणि राष्ट्राच्या एकता-अखंडतेचा संदेश पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. तिरंगा यात्रा शासकीय विश्रामगृह येथे पोहोचल्यानंतर आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत भारतमाता व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राष्ट्रहित, समाजसेवा व लोककल्याणाच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत, ‘वंदे मातरम्’ आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तिरंगा यात्रेस माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, नगराध्यक्ष वैभव बागूल आदी उपस्थित होते. सटाण्यात प्राचार्य अनिल पाटील यांचे प्रतिपादन प्रतिनिधी | सटाणा स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता नव्हे, तर असंख्य स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून मिळालेला अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या असिम त्यागामुळेच आज आपण लोकशाहीच्या मुक्त वातावरणात स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्याच्या या ठेव्याप्रती कृतज्ञ राहून राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय एकता व सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल पाटील यांनी केले. मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मन्साराम सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), रोव्हर रेंजर्स, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. हातात फडकणारे तिरंगे, ढोल-ताशांचा निनाद आणि देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून गेले. नगरपरिषद कार्यालय, सराफ बाजार, यशवंतराव महाराज मंदिर, कॅप्टन अनिल पवार चौक, दोधेश्वरनाका मार्गे रॅली सटाणा बसस्थानकात पोहोचली. रॅलीच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. नरेंद्र निकम, सुनिता शेवाळे, डॉ. राजेंद्र वसाईत, प्रा. तुषार खैरणार, प्रा. मनीषा साळुंके, ललित बिरारी आदींनी परिश्रम घेतले.
Source link
तिरंगा रॅली:‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी चांदवडला देशभक्तीचा जागर