Headlines

भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा:शनिदेवांच्या तेलातही ‘भेसळ’चा संशय




श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिचौथऱ्यावर शनिमूर्तीला वाहण्यासाठी भेसळयुक्त अथवा बनावट तेलाची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत आणि दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अमोल वाढेंकर, लखन ढगे, अर्जुन महाले व संतोष डांगे यांनी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. शनिशिंगणापूर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून शनिमूर्तीवर वाहिले जाते. याचाच गैरफायदा घेत काही विक्रेत्यांकडून भेसळयुक्त किंवा बनावट तेलाची विक्री केली जात असल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. तेलाचा दर्जा, गुणवत्ता आणि त्यातील घटकांची नियमित तपासणी होते का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. भेसळ आढळल्यास भाविकांची आर्थिक फसवणूक होण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व भेसळ विभागाने विशेष मोहीम राबवून तेलाची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. शनिशिंगणापूर येथे बनावट तेल विक्री सुरू असल्याचे निवेदन देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांना देताना ग्रामस्थ. नमुने तपासा, सत्य बाहेर काढा शनिशिंगणापूरसारख्या धार्मिक स्थळी भाविक मोठ्या श्रद्धेने तेल खरेदी करतात. त्यामुळे तेलाच्या गुणवत्तेबाबत तक्रार झाल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, तपासणीचा अहवाल येईपर्यंत तेलात भेसळ असल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या तपासणीकडे भाविकांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *